अलिबाग | अलिबाग येथील दीड कोटींच्या दरोडा प्रकरणात सांगली येथील आणखी दोघांना सोमवारी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत सहाजणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दोघांना न्यायलयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. विशाल पिंजारी, अक्षय खोत अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
कमी किमतीत सोने देतो सांगून दीड कोटी रुपये लंपास करण्याच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला असून, १ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक करून लंपास केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख आरोपी समाधान पिंजारी आणि त्याचा सहकारी दीप गायकवाड यांना अटक केली. विशेष म्हणजे, या कटात तीन पोलीस अंमलदारांचाही सहभाग असून त्यापैकी विकी साबळे व समीर म्हात्रे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
तर समाधान पिंजारी याचा भाऊ विशाल पिंजारी व इको चालक (एम एच ०१ए-११२६) अक्षय खोत (दोघेही रा.आठपाडी, सांगली) यांच्याकडून दीड कोटी रुपयांची रक्कम गुन्हे अन्वेषण विभगाने जप्त केली आहे. मंगळवारी दुपारी विशाल पिंजारी आणि अक्षय खोत यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
स्वस्त दरात सोने देतो असे सांगून नागपूर आणि कामोठे येथील दोन सराफांची पोलिसांनी दीड कोटी रूपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात घडला आहे. पोलिसांनीच फिल्मी स्टाईलने लूट केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.