कर्जत | कर्जत तालुक्यातील नेरळ येथील महसूल विभागाचे मंडळ अधिकारी संदीप भंडारे तसेच महसूल खात्याचे निवृत्त कारकून धोंडू गायकवाड या दोघांना लाच घेतल्याने अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मंडळअधिकारी भंडारे यांच्या डोंबिवली येथील घरातून ४५ लाखांची रोकड सापडली असल्याचे सांगण्यात येत असून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दामत येथील मोहम्मद मुसेब खोत हे आपले नातेवाईक वदीसा मोहम्मद अमीन मदनी यांच्या जिते येथील जमिनीची नोंद घालण्यासाठी मंडळ अधिकारी कार्यालयात येत होते. त्या जमिनीच्या फेराफार नोंदीसाठी १५ हजारांची लाच मंडळअधिकारी संदीप भंडारे यांनी मागितली होती. सदर लाचेची रक्कम निवृत्त महसूल कर्मचारी धोंडू गायकवाड यांच्या माध्यमातून स्वीकारली आणि मंडळ अधिकारी भंडारे यांच्या टेबलचे ड्रॉवर मध्ये ठेवून दिले.
या लाचप्रकरणाची नोंद नेरळ पोलिसांत केली आहे. यातील संदीप रामचंद्र भंडारे याच्या डोंबिवली येथील घरी धाड टाकली असता तेथे साधारण ४५ लाखांची रोकड मिळाली असल्याचे बोलले जात आहे. त्याचेवळी भंडारेच्या कारमधून ८० हजारांची रोकड तर त्यांच्या स्वतःकडे देखील २५ हजारांची रोकड आढळून आली असल्याचे बोलले जात असून अधिकृत माहिती लाचलुचपत विभागाकडून मिळाली नाही.
लाचेची रक्कम खाजगी व्यक्ती दुंदा बारकु गायकवाड (वय ६५ वर्षे, सेवानिवृत्त कोतवाल) याने स्वीकारण्याबाबत प्रोत्साहन दिले तरी संदीप रामचंद्र भंडारे, वय-५१, मंडळ अधिकारी नेरळ तसेच खाजगी इसम दुंदा बारकु गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.