उरण | उरणचाही औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने परप्रांतीयांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामध्ये बांगलादेशीही असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. उरण शहर व तालुक्याच्या सुरक्षेसाठी परप्रांतीय नागरिकांचे व्हेरीफिकेशन करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
त्यानंतर द्रोणागिरी नोडमधील गामी ग्रुप या विकासकाच्या बांधकाम साईटवर उरण पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर येथे काही कामगार बांगलादेशी असल्याचे उघड झाले आहे. आजच्या घडीला उरण परिसरात बेसुमार बांगलादेशी असून त्या सर्वांची तपासणी केली तर नक्कीच बांगलादेशीयांचे पितळ उघडे पडेल. उरण तालुक्याची भौगोलिक स्थिती पाहता तालुक्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे.
या किनार्याच्या माध्यमातून येथील भागात औद्योगिक विकासही झापाट्याने होत आहे. नौदलाचे शस्त्रागार, तेल व नैसर्गिक वायू शुद्धीकरण प्रकल्प, देशातील सर्वात मोठे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, गॅस आधारीत वीज प्रकल्प, तेल साठवणूक प्रकल्प, भारत पेट्रोलिअमसारखे गॅस वितरण प्रकल्प उभारण्यात आले आहेत. तर बंदरावर आधारीत शेकडो कंटेनर यार्ड, फ्रेट स्टेशन या तालुक्यात उभारण्यात आले आहेत.
त्यामुळे उरण तालुका अतिसंवेदनशील प्रकल्प बनला आहे. त्यात उरण रेल्वे सुरू झाल्याने परप्रांतीयांना पळण्यासाठी सोयीचा मार्ग ठरू शकतो. उरण द्रोणागिरी नोड येथे गामी ग्रुप या विकासकाची बांधकाम साईट सुरु आहे. या साईटवरील संबंधित लेबर ठेकेदाराने आपल्या कामावर काही बांगलादेशी कामगार कामावर ठेवले असल्याची गुप्त माहिती उरण पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार उरण पोलिसांनी मंगळवारी (११ फेब्रुवारी) सापळा रचून सदर बांधकाम साईटवर काम करीत असलेल्या कामगारांची तपासणी केली असता ७ बांगलादेशी पुरुष आढळून आले.
या घुसखोरांकडून आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. उरण शहरात मोठ्या प्रमाणात पुर्नविकासाची कामे सुरु आहेत. त्यामुळे येथे कामगारांची मोठी मागणी आहे. मागील वर्षीदेखील नवी मुंबई पोलीस ठाणे अंतर्गत केलेल्या शोधमोहिमेत अनेक बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती, असे सूत्रांनी सांगितले. फेरीवाला, मजूर काम, घरातील धुणीभांडी, लेडीज सर्व्हिस बार अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही मंडळी काम करत असल्याचे पोलिसांना आढळले आहे.
उरण व उरणकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठेवण्यात आलेल्या सर्व भाडेकरूंची कागदोपत्री तपासणी तातडीने करून त्याची माहिती पोलीस यंत्रणेला लेखी स्वरूपात द्यावी. त्यानंतर शहरात व तालुक्यात कोंबिंग ऑपरेशन करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उरण तालुका मराठी पत्रकार संघाने यापूर्वीच केली होती, परंतु याची दखल घेऊन जरी कारवाई करण्यात आली असली तरी आजच्या घडीला ठोस कोंबिंग ऑपरेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे.