पोलादपूर | तालुक्यातील अग्रगण्य एसडीएफसी बँकेत गुरूवारी (१३ फेब्रुवारी) दुपारी एका खातेदाराने दिलेल्या चेकवर एक लाखाची रक्कम लिहिली असतान कॅशियरने चक्क दोन लाख रूपये दिले. यानंतर रक्कम घेऊन बॅगमध्ये ठेवणार्या खातेदाराला चेकपेक्षा एक लाख रूपये रक्कम जास्त असल्याचे दिसून आल्याने त्याने प्रामाणिकपणे रक्कम परत केली.
एसडीएफसी बँकेत कॅशियर रजेवर असल्याने मोर्बा येथील शाखेतील कॅशियर महिला या कामासाठी रूजू झाली आहे. गुरूवारी दुपारी काटेतळी येथील विजय गोविंद मोरे यांनी १ लाखाचा चेक लिहून कॅशियरकडे दिला आणि कॅशियरने दिलेली रक्कम बँकेमध्ये ठेऊन ते त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले.
त्यांनी काही वेळाने रक्कम मोजली असता एक लाखाऐवजी दोन लाख रूपये बॅगेत असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी त्यांचे स्नेही अॅड. मंगेश मोहिरे वकीलांना ही बाब सांगितली. कोणतीही कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये म्हणून विजय मोरे यांनी चर्चा केली आणि सायंकाळी बँक बंद होण्यापूर्वी एसडीएफसी बँकेत जाऊन एक लाखाची जादाची रक्कम कॅशियरकडे जमा केली.
पोलादपूर एसडीएफसी बँकेचे मॅनेजर निलेश आंबेतकर यांनी आमच्या बँकेच्या सेवेप्रमाणे आमचे ग्राहक व खातेदारदेखील प्रामाणिक असल्याचे या घटनेतून सिध्द झाले असून आम्ही ग्राहक विजय मोरे यांच्या प्रती आदर व्यक्त करीत असल्याचे यावेळी सांगितले.