अलिबाग | अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी गरोदरपणाच्या तपासणीसाठी आलेल्या महिलेचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे. त्याआधीदेखील अनेक रुग्णांचे पैसे गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सीसीटिव्ही फुटेजदेखील सापडत नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये घबराट पसरलेली आहे.
अलिबाग तालुक्यातील रेवस कोळीवाड्यातील एक महिला तपासणीसाठी अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात आली होती. यावेळी तिचा रक्तदाब अचानक वाढला. तेथील कर्मचार्यांनी तिला अॅडमिट करावे लागेल, असे सांगितले. तिला मॅटर्निटी वॉर्डमध्ये आणण्यात आले. या महिलेच्या अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितले. तेव्हा तिच्या बहिणीने अंगावरील कुडी, चमकी आणि मंगळसूत्र काढून आपल्या बॅगेत ठेवले. ही बॅग तिने आपल्या जवळच ठेवली.
वैद्यकीय तपासणी सुरू असताना स्टाफने ही बॅग समोरच्या रूममध्ये ठेवण्याचा आग्रह धरला. त्यामुळे ही बॅग तिने समोरच्या ड्रेसिंग रुममध्ये ठेवली. लघवी नमुना आणण्यासाठी बाथरूममध्ये जावून आल्यानंतर दागिन्यांपैकी चमकी खाली पडलेली आढळली. त्यामुळे या महिलेने ड्रेसिंग रूममध्ये बॅग तपासली असता त्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र गायब झाल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत विचारणा केली असता कुणीच काही सांगेना.
तेथील स्टाफने सर्वांना हजर करण्याचे आश्वासन दिले; मात्र कुणालाच आणले नाही. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ड्रेसिंग रुममध्ये कुणी गेल्याचे दाखवले नाही, अशी तक्रार तेजश्री कोळी यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात केली आहे. यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या आधीदेखील रुग्णालयातून अशाच छोट्या मोठ्या चोर्या झाल्या आहेत. मात्र रुग्णांकडून पोलिसांत तक्रार केली न गेल्यामुळे याची वाच्यता होत नाही. मात्र परवाची चोरी आणि त्याआधी एकदा अशाप्रकारच्या चोरीची तक्रार अलिबाग पोलिसांत दाखल आहे.
आमदार महेंद्र दळवी जिल्हा रुग्णालय प्रशासनावर संतापले
जल्हा सरकारी रुग्णालयात होणार्या चोर्यांची माहिती अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला चांगलेच झापले आहे. जिल्ह्यातून रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. सीसीटिव्ही असतानाही रुग्णालयातून चोर्या होतातच कशा? याप्रकरणी पोलिसांत तक्रार करा आणि चोराला शोधून काढा, असे त्यांनी प्रशासनाला बजावले आहे.