पुणे | पुण्यातून सुरु झालेल्या गिया बार्रेचे रुग्ण आता राज्यभरात आढळत आहेत. दुषित पाण्यामुळे या आजाराचा धोका असल्याचे सांगितले जात होते. मात्र चिकनमुळेही ‘जीबीएस’चा आजार होऊ शकतो, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे चिकन पूर्ण शिजवून सोबतच चिकन घेताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
पुण्यासह कोल्हापूरपर्यंत तर नागपूरपासून मुंबईपर्यंत ‘गिया बार्रे सिंड्रोम’ म्हणजे जीबीएसच्या आजाराचा धोका वाढला आहे. जीबीएसने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. तर कित्येकजण जीबीएसशी रुग्णालयात झुंज देत आहेत. सुरुवातीला जीबीएस हा दूषित पाण्यामुळे होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता; पण आता सरकारी यंत्रणांनी वेगळाच दावा केला आहे.
जीबीएस हा अर्धवट शिजवलेल्या चिकनमुळे झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. चिकन खाणार्यांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही. रोज हजारो किलो चिकन महाराष्ट्रातील जनता फस्त करते. सरकारच्या या दाव्यामुळे चिकन खाताना योग्य ती काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. चिकन सेंटरमध्ये सुदृढ कोंबड्या आणल्यात का? याची खात्री करा.
स्वच्छ मांस आपण विकत घेतो का? याची दक्षता घ्या. घरी आणलेले मांस १०० अंश सेल्सियस तापमानावर शिजवून घ्या. अर्धवट शिजवलेले मांस किंवा चिकन खाऊ नका. चिकनच्या माध्यमातून जीबीएससारखे आजार पसरल्याचे समोर आल्यामुळे घाबरुन जावू नका, पण खातोय ते चिकन योग्य प्रक्रिया केलेले आहे का? याची खात्री करा. अन्यथा जीबीएससारख्या आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.