पनवेल | पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या गाढी नदीवरील देहरंग धरणाची उंची वाढविण्याच्या नियोजित प्रकल्पास आर्थिक पाठबळ देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिकेची स्थापना ०१ ऑटोबर २०१६ रोजी झाली असून, मुंबई, नवी मुंबई शहरालगत असल्यामुळे तसेच विमानतळ व परिसरातील औद्योगिकरण यामुळे महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. महानगरपालिका क्षेत्राची प्रती माणसी १५० लीटर या मापकाप्रमाणे दैनंदिन स्थुल गरज ३९४ दश लक्ष लिटर असून २०५७ पर्यंत ८४७ दश लक्ष लिटर असणार आहे.
सद्यस्थितीत महानगरपालिका क्षेत्रास देहरंग धरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका (मोर्बे धरण) व एमआयडीसी यांच्याकडून सुमारे २२४ दश लक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. तथापि वाढती लोकसंख्या विचारात घेता भविष्यात त्यामध्ये फार मोठी तुट येण्याची शयता आहे. ही तुट भरून काढण्यासाठी दुर्देवाने पनवेल महापालिकेकडे स्वतःच्या मालकीच्या देहरंग धरणाची उंची वाढवण्याच्या पर्यायाशिवाय अन्य पर्याय दृष्टीपथात नाही, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या निवेदनात अधोरेखित केले.
महानगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणाची पूर्ण संचय पातळी वाढविल्याने पाणी संचयात मोठी वाढ होऊन त्याच्या वापर सुलभरीत्या व कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून होणार आहे. देहरंग धरणाची उंची वाढविणे संदर्भात व त्यासाठी करावयाच्या आर्थिक तरतुदीसंदर्भात आयुक्त- पनवेल महानगरपालिकेने आपल्याकडे ०९ जानेवारी २०२५ रोजी एक प्रस्तावही सादर केला आहे.
देहरंग धरणाची पूर्ण संचय पातळी २० मीटरने वाढविणे व त्यासाठी २९४ हेटर जमीन संपादन करण्यासाठी सुमारे ९०० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र नव्याने स्थापन झालेल्या महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारने त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे