पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Raigad Times    17-Feb-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई | पालकमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच हा तिढा सुटेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर पालकमंत्री पदाबाबतचा अधिकार राज्याच्या प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांना आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील. ते जो निर्णय घेतील तो मान्य असणार, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
 
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना प्रचंड आग्रही असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. त्यात रायगडच्या पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरेंचे नाव होते. सेनेचा तटकरेंच्या नावाला तीव्र विरोध असतानाही त्यांचीच वर्णी लागली.
 
त्यामुळे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. परिणामी, रायगडसह नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीलादेखील सेनेच्याच विरोधामुळे स्थगिती मिळाली. रायगडसाठीही भाजपने संपर्कमंत्री जाहीर केला आहे. आशिष शेलार यांच्याकडे भाजपने रायगडचे संपर्कमंत्रीपद दिले आहे.
 
मात्र पालकमंत्रीपद अजूनही जाहीर करण्यात आलेले नाही. महाडचे आमदार असलेले भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी उत्सुक आहेत. जिल्ह्यातील सेनेचे अन्य आमदारही त्यांच्याच नावासाठी आग्रही आहेत. अदिती तटकरे यांना दिलेल्या पदाला स्थगिती आहे. रायगडची कामे खोळंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचा हा तिढा सुटणार कधी? असा प्रश्न रायगडकरांना पडला आहे.