अंजलीच्या हाती आली लेखणी, तिने घेतली राज्यभरारी

विज्ञान प्रदर्शनात अंजलीने तालुका, जिल्हास्तरावर पटकावला प्रथम क्रमांक

By Raigad Times    18-Feb-2025
Total Views |
KARJT
 
कर्जत | कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या झुगरेवाडी शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणार्‍या अंजली भास्कर वाघ या विद्यार्थिनीने नुकत्याच झालेल्या तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सरस कामगिरी केली आहे. अंजलीने तालुका व जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 
तर राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तिच्या विज्ञान प्रकल्पाचे उत्कृष्टपणे सादरीकरण केल्याने आयोजकांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप देत तिचे मनापासून कौतुक केले आहे. रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक व कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम बहुलभाग असलेल्या झुगरेवाडी येथील अंजली भास्कर वाघ ही काही काळ शाळाबाह्य विद्यार्थिनी होती. ती हुशार असूनही केवळ परिस्थितीमुळे तिला तिच्या आई वडिलांसोबत वीटभट्टीवर जावे लागले होते.
 
अंजली हुशार असल्याने झुगारेवाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक रवी काजळे व सतीश घावट यांनी तिच्या पालकांशी संपर्क साधून तुमची मुलगी हुशार आहे तिला कृपया शाळेत पाठवा असे सांगितल्याप्रमाणे वडिलांनीही शिक्षकांचे म्हणणे ऐकून तिला शाळेत पाठवण्यास सुरू केली.
 
शाळेत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने अंजलीला अभ्यासाची व शाळेची आवड निर्माण झाली. यातूनच विज्ञान शिक्षक राजश्री पाटील व नंदादीप चोपडे यांनी तिच्यावर विश्वास ठेवून रस्ते सुरक्षा या प्रकल्पासाठी तिची तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड केली.
 
आपल्या प्रभावी वक्तृत्वाची चमक दाखवत तिने तालुका व जिल्ह्यात आदिवासी गटातून प्रथम क्रमांक मिळवत, अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान विद्यालय येथील आयोजित राज्यस्तरीय ५२ व्या विज्ञान प्रदर्शनात विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला. झुगरेवाडी शाळेच्या स्थापनेपासून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे तिने मिळविलेले यश हे उल्लेखनीय आहे. अंजलीला जर शिक्षकांनी शाळेत आणले नसते तर शाळा अशा एका गुणी विद्यार्थिनीला मुकली असती, अशी प्रतिक्रीया झुगरेवाडी येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.