गेम कींग जुगाराच्या चक्रीत रायगडचा तरुण गुरफटतोय

By Raigad Times    18-Feb-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | कोणी घर गहाण ठेवले, कोणी घरातील दागिने गहाण ठेवले, तर कोणी घरातील पैसे चोरुन जुगारात घालवले..."गेम कींग चक्री” नावाच्या ऑनलाईन जुगाराची चक्री अशी काही फिरत आहे की, रायगड जिल्ह्यातील तरुण या चक्रीत बेमालूमपणे गुरफटत चालला आहे. या ऑनलाईन जुगारापायी अनेकांनी लाखो रुपये गमावले असून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे रायगड पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मनसेचे अलिबाग तालुकाप्रमुख सिद्धांत म्हात्रे यांनी केली आहे.
 
रोहा तालुक्यातील खारपटी गावातील रहिवासी नरेश डोळकर या वयोवृध्द पित्याचा मुलगा विपुल या ऑनलाईन जुगाराच्या नादी लागला. या तरुणाला इतके वेड लागले की, ऑनलाईन जुगाराच्या वेडापायी त्याने घरातील दागिने गहाण टाकले, गाडी विकली; इतकेच नव्हे तर वडिलांच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी ठेवलेले एक लाख रुपयेदेखील या तरुणाने जुगारात घालवले आहेत. आतापर्यंत चार-पाच लाख रुपये या मुलाने ऑनलाईन जुगाराच्या वेडापायी गमावले असल्याचे नरेश डोळकर सांगतात.
 
नरेश डोळकर म्हणतात, माझा मुलगा तर ‘गेम कींग चक्री’ या जुगाराच्या आहारी गेलाच आहे; पण अन्य पालकांनी सावध व्हावे, यासाठी आपण रोहा पोलिसांकडेदेखील दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचे फारसे सहकार्य मिळाले नाही. यानंतर त्यांनी अलिबाग येथील मनसेचे कार्यालय गाठले आणि तालुकाप्रमुख सिद्धांत म्हात्रे यांच्याजवळ आपबिती कथन केली. याआधी असेच एक प्रकरण घेऊन महिला सिद्धांत म्हात्रे यांच्याकडे आली होती.
 
या महिलेने घर बांधण्यासाठी जमा केलेले पैसे तिचा पती गेम किंग या ऑनलाईन जुगारात घालवून बसल्याचे सांगितले. हे प्रकरण पाहता या जुगारात अनेक तरुण बरबाद होत आहेत, असे दिसत असून, रायगडचे पोलीस अधिक्षक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब निदर्शनात आणून देऊ, असे म्हात्रे यांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, कुठलीही मेहनत न करता, झटपट श्रीमंत होण्याचा नादात अनेक तरुण या गेम किंग व्हिडिओचा खेळ खेळण्यात ओढली जात आहेत. अनेक तरुण या खेळापायी बरबाद होत आहेत. कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. रायगड जिल्ह्यात या खेळाचा मोठा बोलबाला आहे. या खेळाला पोलिसांनी कुठे तरी चाप लावला पाहिजे, अशी मागणी मनसेने केली आहे.