माणगाव | म्हसळा तालुक्यातील चिराठी गाव ‘स्वप्नातील गाव’ घोषित करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणानंतर गावात मोठ्या धूमधडाक्यात लेझिम नृत्याच्या साथीने मिरवणूक काढण्यात आली. स्वागतगीत, पाहुण्यांचे उत्स्फूर्त स्वागत व कार्यक्रमातील मनोहर भाषणांनी वातावरण खुलले. स्वदेस फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली स्वछ, सुंदर, स्वास्थ्य, साक्षर, समृद्ध या पाच ठरवलेल्या निकषांवर आधारित गावाने ७६ टक्के निकष पूर्ण करत प्रगती गाठली आणि आज त्याच्या मेहनतीचे सार्थक होत स्वप्नातील गाव म्हणून ओळखले गेले. यामध्ये गावातील महिला, पुरुष आणि वयोवृद्ध यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या ऐतिहासिक क्षणी मुंबईकर मंडळींनीही उपस्थित राहून समर्थन दिले. गावकर्यांना त्यांच्या स्वप्नाच्या यशस्वी साकारतेला पाहून आनंदाला उधाण आले होते. स्वदेस फाऊंडेशन आणि शासनाच्या सहकार्याने गावच्या कठोर प्रयत्नातून गावाने कशी प्रगती केली आणि कोणते प्रमुख कार्य पूर्ण केले याबद्दल माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गाव विकास समिती व गावाला प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद वाघे यांनी केले. गाव विकास समिती अध्यक्ष लक्ष्मण मांडवकर आणि सदस्य गोविंद नाचरे यांनी गावाच्या झालेल्या प्रगतीचा आढावा सांगितला. नगरसेवक सुनील शेडगे यांनी स्वदेस फाऊंडेशनच्या सहकार्यातून झालेल्या कामाची प्रशंसा व ग्रामस्थांनी एकजुटीतून केलेल्या कामाचे कौतुक केले, भविष्यातील प्रलंबित कामांची उर्वरित प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
ज्यामुळे चिराठी गाव १०० टक्के पूर्णत्वाच्या शिखरावर पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल करेल. तसेच गावासाठी आरोग्य सेवा देणार्या स्वदेस मित्र प्रमिला चव्हाण, अंगणवाडी सेविका सानिका उद्धरकर, माजी अध्यक्ष सहदेव मांडवकर, सचिव विनोद वाघे, संतोष मांडवकर, महादेव मोरे, मुंबईकर मंडळ, तसेच गाव विकास समितीमधील सर्व सदस्यांचे सन्मान करण्यात आले.
स्वदेस फाऊंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवतेज ढऊळ आणि विशाल वरूठे यांनी गावाला, केलेल्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. या ऐतिहासिक क्षणी स्वदेस फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक विशाल वरुटे, वरिष्ठ व्यवस्थापक शिवतेज ढऊळ, वरिष्ठ समन्वयक अरविंद पाताडे, चांगदेव सानप, पत्रकार संतोष उद्धरकर, नगरसेवक व पाणी पुरवठा सभापती सुनिल शेडगे, तलाठी कांबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. चिराठी गाव परिवर्तनाचा हा दिवस सर्वांसाठी विशेष अविस्मरणीय ठरला.