१९ फेब्रुवारीला ‘शिवजयंती’निमित्ताने...‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा

विद्यार्थी, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ; जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आवाहन

By Raigad Times    18-Feb-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होत असून, यानिमित्ताने ‘शहरात जय शिवाजी, जय भारत” पदयात्रेचे आयोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या पदयात्रेत शाळा व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. या दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरद ृश्यप्रणालीद्वारे देशास संबोधित करणार आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
 
यावेळी निवासीउपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांसह पोलीस विभाग, पनवेल महानगरपालिका तसेच विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, पदयात्रेचा शुभारंभ पोलीस कवायत मैदान येथून होणार आहे. तर शिवाजी चौक येथे समारोप होणार आहे.
 
यादरम्यान विविध चौकात मल्लखांब, दाडपट्टा, कुस्ती, आदिवासी नृत्य, योग, लेझिम पथक, पारंपारिक पोषाखातील मुले, स्वच्छता अभियान, समूहगानाचे आयोजन करण्यात येणार आहे या पदयात्रेत ५ हजार विद्यार्थी, नागरिक, महिला सहभागी होणार आहेत. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता शिवचरित्रावर व्याख्यान होणार आहे. सकाळी ८.३० वाजता पदयात्रेस प्रारंभ होणार आहे. या पदयात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आरोग्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सची सुविधा करण्यात यावी. पोलीस विभागाने या दरम्यान वाहतूक व्यवस्था चोख ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी संबंधितांना दिले.
 
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात हा कार्यक्रम दिमाखदारपणे साजरा झाला पाहिजे. याकरिता ज्या ज्या विभागांना या पदयात्रेदरम्यान जबाबदार्‍या दिल्या आहेत. त्या त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडाव्यात अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा असलेली पाच मुले व भारत मातेची वेशभूषा असलेल्या पाच मुली आणि त्यांच्याकरिता लागणारे घोडे याचे नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांनी पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जावळे यांनी केले आहे.