उलवेमध्ये बेकायदा चिकन मटणची दुकाने तेजीत , कारवाईच्या मागणीसाठी आजपासून संतोष काटे यांचे उपोषण

By Raigad Times    19-Feb-2025
Total Views |
uran
 
उरण | उलवेमध्ये विनापरवाना, अनधिकृत मटण चिकनची दुकाने तेजीत असून, या उघड्यावरील दुकानांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. या बेकायदा दुकानांवर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उलवे शहर अध्यक्ष संतोष काटे यांनी केली असून, आजपासून उपोषणाला बसणार आहेत.
 
नवी मुंबई विमानतळ क्षेत्रात विमानतळच्या बिंदूपासून १० किलोमीटर परीघात प्राण्यांची कत्तली करणे, त्याची कातडी वा अवशेष टाकणे, कचरा व इतर प्राणघातक पदार्थ टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण अनेक पशूपक्षी हे मांस, पदार्थ खातात, आजूबाजूच्या परिसरात अन्न शोधण्यासाठी येतात व विमान उडत असताना या पक्ष्यांचा विमानाला अपघात होतो व आगी लागणे किंवा इतर तांत्रिक बिघाड विमानात होतात.
 
घातक पदार्थ, प्राण्यांची कत्तल, त्यांचे कुजलेले अवशेष यामुळे रोगराई पसरून विविध नवनवीन विषाणूचा जन्म होऊन विविध जीवघेणे रोगराई पसरते. रोगाची लागण नागरिकांना होते म्हणून शासनाच्या एरोड्रेम पर्यावरण व्यवस्थापन समितीने विविध निर्बंध लादत १० किलोमीटर परिसरात प्राण्यांची कत्तल करु नये, अवशेष टाकू नये, कचरा करु नये, असे निर्णय घेतला आहे. मात्र या नियमांची पायमल्ली विमानतळापासून १० किलोमीटर परिसराच्या आत असलेल्या उलवे शहरामध्ये दिसून येत आहे.
 
उलवेत बेकायदा चिकन मटणच्या दुकानाकडे स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने, चिकन मटण विक्रेत्यांनी शाळा, कॉलेज, मंदिरे, चौक, महत्वाचे रस्ते, कॉर्नर रस्त्यावर तर कुठे गटारावर आपली दुकाने सुरु केली आहेत. त्यामुळे नागरिकांचे तसेच विविध पशु पक्ष्यांचेही अस्तित्व, जीवनमान, आरोग्य धोक्यात आले आहे. अशा दुकानांवर कारवाई करावी, यासाठी १९ फेब्रुवारीपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, सेक्टर १९, उलवे शहर, पनवेल तालुका, जिल्हा रायगड येथे संतोष काटे हे आमरण अन्नत्याग उपोषण करणार आहेत.