कर्जत | कर्जत तालुक्यातील भडवळ गावात मागील आठवडा पासून चोर येत असल्याची चर्चा आहे. गावातील तीन ग्रामस्थांची घरे फोडली असून तोंडावर मास्क आणि हातात स्प्रे असलेले हे चोर घरचे बंद दरवाजे फोडून चोर्या करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे भडवळ गावातील ग्रामस्थांनी आता रात्रीचा पहारा सुरू केला केला आहे.
शेलू रेल्वे स्टेशन पासून जवळ असलेल्या भडवळ गावामध्ये मागील काही दिवस चोर्यांचे सत्र सुरू आहे. मध्यरात्री नंतर पहाटेच्या सुमारास ही चोर जंगलाच्या बाजूने गावात येतात आणि त्यानंतर सुस्त झोपेत असलेल्या गावकर्यांच्या घराचा शोध घेतात.दरवाजा फोडून आत गेल्यावर कोणी अडवले तर हातातील स्प्रेचे मारुन व्यक्तीला बेशुद्ध करण्यात येते अशी चर्चा आहे. मध्यरात्र उलटल्यानंतर ही चोर गावात येत असल्याने गावातील तरुणांच्या मदतीला नेरळ पोलिस देखील रात्री पोहचले.
रात्री पोलिसांनी दोन राऊंड मारले मात्र ग्रामस्थांच्या मनातील भीती अद्याप कमी झालेली नाही . तानाजी म्हसकर आणि रघुनाथ झोमटे या दोन्ही घरांमध्ये हे चोर शिरले होते. तेथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावामध्ये पाच दिवसापासून सतत गावामध्ये चोर येत आहेत. गावातील चोराच्या सतत घडणार्या घटना यांच्याबद्दल आम्ही नेरळ पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मागील दोन दिवस रात्रीची गस्त वाढवली असून गावात देखील राऊंड होत आहेत. आता अशाच घटना घडत राहिल्यास त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावून बंदोबस्त केला जाईल अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी दिले आहे.