आयआयएम इंदोरच्या अभ्यासगटाची नवी मुंबई मनपाला भेट

सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन प्रणालीची केली पाहणी

By Raigad Times    19-Feb-2025
Total Views |
new mumbai
 
नवी मुंबई | स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा समावेश ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष गटात करण्यात आला असून नवी मुंबईसह इंदोर आणि सुरत ही दोन शहरे या विशेष गटात आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतेमधील आपले मानांकन नेहमीच उंचावत ठेवले असून देशाच्या विविध भागांतून अभ्यास गट नवी मुंबई महानगरपालिकेस भेटी देत असतात.
 
या अनुषंगाने मंगळवारी (१८ फेब्रुवारी) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदोर संस्थेच्या २१ जणांच्या अभ्यास गटाने ‘वापरात आल्यानंतरच्या पाण्याचे अर्थात सांडपाण्याचे व्यवस्थापन’ या विषयाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेस भेट दिली. महानगरपालिकेमार्फत याबाबत केल्या जात असलेल्या कार्यवाहीची प्रत्यक्ष प्रकल्प भेटी देऊन माहिती जाणून घेतली.
 
नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त संतोष वारुळे यांनी अभ्यासगटाचे प्रमुख आयआयएम इंदोरच्या शैक्षणिक विभागाचे उपमहाव्यवस्थापक राहुल भट यांचे स्वागत करुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन व मलनि:स्सारण व्यवस्थापन कार्यप्रणालीची सविस्तर माहिती दिली. यावेळी अभ्यासगटाचे प्रतिनिधी असलेल्या देशातील विविध शहरांतील पर्यावरणविषयक अभ्यासक असलेल्या अभियंता अधिकारीवर्गाने विचारलेल्या विविध प्रश्नांवर माहिती देत त्यांनी शंका समाधान केले.
 
अभ्यासगट प्रतिनिधींनी नवी मुंबई महानगरपालिकेची आयकॉनिक मुख्यालय वास्तू, शास्त्रोक्त पध्दतीने क्षेपणभूमी बंद करुन कोपरखैरणे येथे फुलविलेले निसर्ग उद्यान, तेथील स्वच्छता पार्क व मियावाकी शहरी जंगल, कोपरखैरणे येथील एसबीआर तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्र व तेथील त्रिस्तरीय जलशुध्दीकरण करणारा टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट, पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त बाबींसाठी केला जाणारा उपयोग, टाकाऊपासून टिकाऊ निर्मितीचा अविश्कार असणारे आकांक्षी शौचालय तसेच आपत्कालीन व्यवस्थापनात अत्यंत उपयोगी असलेल्या होल्डिंग पॉन्डवरील फ्लॅप गेट्स व्यवस्थापन-अशा विविध बाबींची पाहणी करत, समाधान व्यक्त केले.