सुधागड-पाली/पेण | पेण तालुक्यातील तिलोरे, वरवणे व सुधागड तालुक्यातील महागाव परिसरातील देऊळवाडी, कलाकाराई, भोप्याची वाडी, कवेळेवाडी येथे भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरल्याची घटना बुधवारी (१९ फेब्रुवारी) रात्री साडेअकरा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली, असे नागरिकांनी स्थानिकप्रशासनास कळविले होते.
सदर घटना भूकंप नसून याबाबत भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.बुधवारी रात्री लोक झोपेत असताना अचानक पेण आणि सुधागडातील काही भागात जमिनीला हादरे जाणवले. भूकंपाच्या भितीने नागरिकांची धावपळ उडाली. अनेकांच्या घरामधील भांडी हलायला लागली. खिडयांची दारे, काचा हलायला लागल्या. त्यामुळे नागरिक घराबाहेर पळून गेले.
या गावात बसले धक्के
पेणच्या तिलोरे, वरवणे तर सुधागडमधील महागाव, भोपेचीवाडी, देऊळवाडी, कवेळीवाडी, चंदरगाव, चंदरगाव अदीवासी वाडी भागात जमिनीला हादरे बसले. त्यामुळे घाबरलेले नागरिक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर आले. सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांनी या गावांना भेट दिली.
जिओलोजिकल सर्व्हे ऑफ इंडिया संस्थेला सर्वेक्षण करण्याची विनंती करणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली. तर नागरिकांनी घाबरु नये तसेच आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित यंत्रणा या सगळ्या परिस्थितीविषयीची माहिती गोळा करत आहे.
प्रशासन अलर्ट मोडवर
जिल्ह्यातील हेटवणे धरणापासून काही अंतरावर असणार्या तिलोरे व महागाव परिसरात रात्रीपासून जमिनीतून सौम्य धक्के जाणवले. बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पहिला धक्का जाणवला. त्यानंतरही काही सौम्य धक्के जाणवल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
हे धक्के जाणवले तेव्हा अनेकांच्या घरातील भांडी पडली, भिंतीवर लटकलेल्या अनेक वस्तू पडल्या. परंतु कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. जिल्हा प्रशासन यासंदर्भात अलर्ट मोडवर असून अधिक माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या घटनेची भारतीय हवामान विभाग मुंबईनुसार तसेच कोयनानगर जि.सातारा येथील भूमापन केंद्र येथे भूकंपाची नोंद झाली नसल्याचे आढळून आले आहे. या ठिकाणी तहसिलदार सुधागड यांनी पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला आहे. सदर घटनेत काही घरांचे किरकोळ नुकसान झाले असून जीवितहानी झालेली नाही. या ठिकाणच्या अधिक सर्वेक्षणासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांना सदर ठिकाणी सर्वेक्षण करण्यास विनंती करण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.