सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा पाहण्याचा कार्यक्रम , मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार कधी?

रायगड जिल्ह्यातील जनतेचा सवाल ; मंत्री म्हणतात, लवकरच!

By Raigad Times    21-Feb-2025
Total Views |
panvel
 
पनवेल | चार सरकारे बदलली, अनेक मंत्री, आमदार, खासदार...इतकेच कशाला केंद्रातील मंत्री गडकरीदेखील येऊन गेले; परंतू मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. यामध्ये आता नव्यानेच बांधकाम मंत्री झालेले शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावाची भर पडली आहे. गुरुवारी, २० फेबु्रवारी रोजी त्यांनीदेखील या महामार्गाच्या कामाची पाहणी केली. मात्र या रस्त्याचे काम नेमके किती दिवसांत, महिन्यांत किंवा वर्षांत पूर्ण होईल? याचे उत्तर त्यांनादेखील देता आलेले नाही.
 
मुंबई-गोवा महामार्गाचे काम सध्या सुरु असले तरी त्याची गती अत्यंत संथ आहे. सुरुवातीला २०१० ला मुंबई गोवा महामार्गाचे रुंदीकरण सुरु झाले. पहिल्या टप्प्यामध्ये पळस्पे ते इंदापूर आणि त्यानंतर पुढील टप्पा करण्याबाबतचे नियोजन होते. दरम्यान, याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीने माघार घेतल्यामुळे हे काम रखडले. त्याचबरोबर निधी वेळेवर मिळाला नसल्यानेसुद्धा मुंबई गोवा महामार्ग ‘ऑन ट्रॅक’वर आला नाही. यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा स्वतः लक्ष घातले.
 
panvel
 
मुंबई गोवा हायवेने कात टाकावी, या उद्देशाने त्यांनी विशेष प्रयत्न केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी त्यांनी समन्वय साधला. तत्कालीन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यासाठी विशेष प्रयत्न आणि पाठपुरावा केला. परंतु तरीसुद्धा हा महामार्ग अपुराच आहे. २०२४ साली भाजप महायुतीचे पुन्हा एकदा सरकार आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पदभार स्वीकारला आहे.
 
यानंतर त्यांनी बरीच वर्षे रखडपट्टी झालेल्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. पळस्पे या ठिकाणाहून त्यांच्या दौर्‍याला सुरुवात झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी उपस्थित होते. पेणच्या वेशीवर माजी मंत्री रवींद्र पाटील आणि राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट घेतली. त्यांनीसुद्धा यासंदर्भातील काही पर्याय आणि उर्वरित कामे सूचवली.
 
panvel
 
याबाबत शिवेंद्रराजे भोसले यांनी सकारात्मक भूमिका घेऊन शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचा नवीन आराखडा तयार करण्याबाबतची ग्वाही दिली. महाड येथेसुद्धा मंत्री भरत गोगावले यांच्याशी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी चर्चा केली. लागलीच कामाला सुरुवात करण्याबाबतचे त्यांनी अधिकार्‍यांना आदेश निर्गमित केले. तत्पूर्वी दिवसभर हा महामार्ग पाहणीचा कार्यक्रम पार पडला. रायगडकर जनतेसाठी हे नवीन नाही. अनेक आले आणि गेले. महामार्गाचे काम काय पूर्ण झाले नाही. हो...या खेपेला मंत्री मात्र नवीन आले होते. त्यांच्याकडून तरी हे काम लवकर पूर्ण होईल का? असा सवाल रायगडकर जनतेने विचारला आहे.
काम पूर्ण न झाल्याची खंत!
सार्वजनिक बांधकाम विभागाचा नव्याने पदभार घेतलेल्या शिवेंद्रराजे भोसले यांनी या अगोदर मुंबई गोवा महामार्गाबाबत मुंबई या ठिकाणी बैठक बोलावली होती. गुरुवारी त्यांनी स्वतः या महामार्गाची पाहणी केली. काम वेळेवर पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आपल्या मनातील खंतसुद्धा बोलून दाखवली.
 
जमीन अधिग्रहण त्याचबरोबर ठेकेदारांनी घेतलेला काढता पाय...या गोष्टीमुळे या महामार्गाचे काम रखडले आहे. अशी खंत स्थानिकांबरोबरच लोकप्रतिनिधी आणि शासनालासुद्धा असल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिली.
भाजप नेते पण बसले जमिनीवर!
माजी आमदार सुरेश लाड यांनी पोलीस ठाण्याच्या पायरीवर झोपून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा मोठा पाठिंबा मिळालेला असून भाजप कार्यकर्ते जमिनीवर बसून आंदोलन करताना दिसात आहेत.
 
जोवर जिल्हा पोलीस अधीक्षक कर्जत येथे येत नाही तोवर आपले आंदोलन सुरूच राहिला असा निर्धार सुरेश लाड यांनी जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांच्यासमोर बोलताना व्यक्त केला.