जिल्ह्यातील १५ हजार ५६० बेघरांना मिळणार हक्काचे घर

By Raigad Times    22-Feb-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मध्ये रायगड जिल्ह्यातील १५ हजार ५६० लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले असून, ११ हजार ७९१ लाभार्थ्यांना लाभाचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ८ हजार १०३ लाभार्थ्यांना लाभाचे वितरण शनिवारी (२२ फेब्रुवारी) करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी दिली आहे.
 
१ जानेवारी ते १० एप्रिल या १०० दिवसांच्या कालावधीत "सर्वांसाठी घरे” या शासनाच्या धोरणांतर्गत बेघरांना घरे देण्यासाठी घरकुलांना मंजुरी देण्यात येत आहे. जिल्ह्यात ग्रामीण २०२४-२५ मध्ये १५ हजार ५६० लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आलेली असून, त्यांची मंजुरी पत्रे देण्यात आली आहेत.
 
तसेच ११ हजार ७९१ लाभार्थ्याना पहिला हप्ता मंजूर करण्यात आलेला असून त्यापैकी ८ हजार १०३ लाभार्थ्यांच्या पहिल्या १५ हजार रुपयांच्या हप्त्याचे वितरण शनिवारी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील कार्यक्रमात करण्यात येणार आहे. तर उर्वरित लाभार्थ्यांना पुढील काही दिवसांत लाभाच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.