‘स्वच्छ नवी मुंबई’साठी आयुक्तांचे बारीक लक्ष!आयुक्त डॉ.कैलास शिंदेंनी घेतला १०० दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा

By Raigad Times    22-Feb-2025
Total Views |
 new mumbai
 
नवी मुंबई | स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने स्वच्छताविषयक सर्वच बाबींवर अधिक बारकाईेने काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी क्षेत्रीय स्तरावरील कर्मचार्‍यांपासून मुख्यालय स्तरावरील विभागप्रमुखांपर्यंत सर्वांनी विभागांमध्ये प्रत्यक्ष जागांवर जाऊन पाहणी करावी व स्वच्छता सुधारणांवर भर दयावा असे सूचित केले.
 
विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीप्रसंगी आयुक्तांनी स्वच्छता कार्याचा तसेच मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील १०० दिवसांच्या कृती आराखडयाचा व न्यायालयीन प्रकरणांचा तपशीलवार आढावा घेत गांभीर्यपूर्वक कार्यवाहीचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि सर्व विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
 
नवी मुंबईच्या स्वच्छतेमध्ये महानगरपालिकेच्या अखत्यारित नसलेल्या महामार्गांवरील स्वच्छतेचा तसेच रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेचा महत्वाचा भाग आहे. यामध्ये रेल्वे स्टेशनवरील शौचालये व स्टेशन परिसराची स्वच्छता या अनुषंगाने सिडको महामंडळाच्या अधिकार्‍यांनाही यावेळी आढावा बैठकीस पाचारण करण्यात आले होते. रेल्वे स्टेशनवरील स्वच्छतागृहांची स्थिती वापरण्यायोग्य व उत्तम असावी याकडे सिडकोमार्फत काटेकोर लक्ष दिले जावे असे यावेळी आयुक्तांनी निर्देशित केले.
 
याबाबत महानगरपालिकेमार्फत सिडकोशी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला असून त्याची तत्परतेने अंमलबजावणी करावी आणि तेथील शौचालयांमध्ये आवश्यक दुरुस्ती कामे करुन सुधारणा करावी व तेथे नियमित स्वच्छता राहील याची गांभीर्याने काळजी घ्यावी असे आयुक्तांमार्फत सिडको अधिकार्‍यांना सूचित करण्यात आले. नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये हे आपले अंतिम उद्दिष्ट असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. स्टेशन परिसराची सखोल स्वच्छता करावी, त्याठिकाणी रंगरंगोटी व सुशोभिकरण करावे, त्या परिसरातील धूळ खात उभी असलेली बेवारस वाहने हटवावीत आणि त्याठिकाणची मलनि:स्सारण वाहिन्यांवरील तुटलेली झाकणे त्वरित बदलून घ्यावीत असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
 
ही कामे करुन घेण्याकडे महानगरपालिकेचे संबंधित विभाग अधिकारी व कार्यकारी अभियंता यांनी बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. याकामी सिडकोला काही मदत लागल्यास ही महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येईल असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. रेल्वे स्टेशन परिसरातील बसस्टॉपच्या ठिकाणी असलेले खड्डे त्वरित भरुन घेऊन सुधारणा करावी असेही निर्देशित करण्यात आले.
 
महापालिका क्षेत्रातील ४५० हून अधिक सार्वजनिक, सामुदायिक शौचालये यांच्या विदयमान स्थितीची पाहणी करण्याची जबाबदारी सर्व स्तरातील अभियंत्यांकडे दयावी व तीन दिवसात अहवाल घेऊन आवश्यक सुधारणा कामे तातडीने करावीत असे निर्देश आयुक्तांमार्फत अभियांत्रिकी विभागास देण्यात आले. मुख्यमंत्री महोदयांनी १०० दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला असून त्यामधील सात कलमांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच विभागांमध्ये कार्यवाहीला प्रारंभ झालेला आहे. प्रत्येक विभागाने आपण करीत असलेल्या कार्यवाहीच्या नोंदी ठेवाव्यात व त्याची छायाचित्रे काढून ठेवावीत असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
 
त्याचप्रमाणे महानगरपालिकेमार्फत याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती व छायाचित्रे महापालिका संकेतस्थळावर अपलोड करण्याच्याही सूचना आयुक्तांनी दिल्या. यावेळीन्यायालयीन प्रकरणांचाही आढावा घेण्यात आला. याप्रसंगी ऑनलाईन तक्रार निवार प्रणालीवर प्राप्त झालेल्या तक्रार निवारणाचा विभागवार आढावा घेताना तक्रारींचे विहित कालावधीत तत्परतेने निवारण करण्यावर अधिक काटेकोर लक्ष दयावे व ‘शून्य प्रलंबितता’ प्रभावीपणे राबवावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.