शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य; सुरेश लाड यांचे आंदोलन मागे

By Raigad Times    22-Feb-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | शेतकर्‍यांच्या जमिनीची मोजणी झाल्याशिवाय कल्पतरु कंपनीने कुंपणाच्या भिंतीचे बांधकाम करू नये, या मागणीसाठी भाजप नेते व माजी आमदार सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस स्थानकाच्या पायरीवरच झोपून ठिय्या आंदोलन सुरू केले होते. गुरुवारी रात्री उशिरा प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी त्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्याने मध्यरात्री एक वाजता त्यांनी उपोषण स्थगित केले.
 
पळसदरी येथील कल्पतरू प्रकल्पात अपंग शेतकर्‍यांवर अन्याय होत कल्पतरु कंपनीने ज्या जमिनी ताब्यात घेतल्या, त्यांच्या सीमाबंदीची मोजणी करावी. तसेच, शेतकर्‍यांना वेळ द्यावी आणि अतिक्रमण थांबवावे. विशेषतः वर्णे येथील पांडुरंग शिर्के या शेतकर्‍यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा सुरेश लाड यांनी उपस्थित केला आहे. या आंदोलनात सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मनमानी कारभारावरही टीका केली.
 
भात खरेदी प्रक्रियेत आदिवासी शेतकर्‍यांची लूट कुणी केली? मुस्लिम कब्रस्तानमध्ये पुरलेला मृतदेह खून होता का? युसूफ खान याच्यावर वैयक्तिक राग मनात धरून केलेली कारवाई यासारख्या मुद्द्यांकडेही सुरेश लाड यांनी लक्ष वेधले. गुरुवारी दुपारपासून कर्जत पोलिस ठाण्यात एकच धावपळ उडालेली पहायला मिळाली. रात्री उशिरा प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ यांनी मागण्या मान्य केल्याचे पत्र दिले.
 
या पत्रात त्यांनी स्पष्ट केले की, जिल्हाधिकारी, अधीक्षक भूअभिलेख रायगड आणि कंपनी प्रशासनातील संपर्क अधिकारी चोरगे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यानुसार, शेतकर्‍यांनी तत्काळ भूअभिलेख खात्याकडे मोजणीसाठी अर्ज करावा व दोन दिवसांत मोजणी शुल्क भरावे. त्यानंतर विशेष बाब म्हणून संबंधित जमिनीची मोजणी तातडीने करण्यात येईल. मोजणी पूर्ण होईपर्यंत कंपनीला संबंधित शेतकर्‍यांच्या जमिनीवर कुंपणाच्या भिंतीचे बांधकाम न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. मध्यरात्री एक वाजता माजी आमदार सुरेश लाड यांनी आपले ठिय्या आंदोलन स्थगित केले.