पेण | न्यायालयाने पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे. या बंदीमुळे या व्यवसायाशी निगडीत एक ते सव्वा कोटी कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे. सरकारने गणेश मूर्तिकारांच्या बाजूने उभे राहून न्यायालयात भूमिका मांडावी आणि पीओपी मूर्तींवरील बंदी हटवावी; अन्यथा रस्त्यासह न्यायालयीन लढ्यासाठी आम्ही तयार आहोत, असा इशारा महाराष्ट्र गणेश मूर्तिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अभय म्हात्रे यांनी पेण येथे आयोजित गणेश मूर्तिकारांच्या जाहीर सभेत दिला.
राज्यातील गणेश मूर्तिकार एकवटून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्रालयावर मोर्चा काढून आंदोलन करणार असल्याची भूमिका शुक्रवार (२१ फेब्रुवारी) च्या बैठकीत स्पष्ट करण्यात आली आहे. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविंद्र पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर, मुंबई गणेश मूर्तिकार समितीचे सचिव सुरेश शर्मा, प्रविण बावधनकर, निलेश जाधव, हमरापूर विभाग श्री गणेश उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष जयेश पाटील, माजी अध्यक्ष कृणाल पाटील, खजिनदार कैलास पाटील, सचिव राजन पाटील, नितीन मोकळ आदींसह शेकडोच्या संख्येने राज्यातील गणेशमूर्तिकार उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे म्हणाले की, पीओपीच्या मूर्तिकारांच्या समस्येसंदर्भात मंत्री पंकजा मुंढे व मंत्री अदिती तटकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. शासन न्यायालयीन पातळीवर पीओपी मूर्तिकारांची बाजू योग्य तर्हेने मांडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पर्यावरण मंत्री, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पीओपी मूर्तिकारांनाच्या माध्यमातून पीओपी मूर्तिकारांना न्याय मिळवून देण्याकरिता कटिबद्ध असल्याची ग्वाही आ. अनिकेत तटकरे यांनी यावेळी दिली. खासदार धैर्यशील पाटील यांनीसुद्धा यावेळी पीओपी मूर्तिकारांच्या संघटनेचा सोबत राहून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
तसेच गरज पडल्यास आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही सांगितले. याप्रसंगी पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र पाटील यांनी शासकीय पातळीवर सर्व वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून न्यायालयात पीओपी मूर्तिकारांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
आपल्यावर आलेली वेळ संघर्षाची आहे
अनेकांच्या रोजगारांचा प्रश्न निर्माण होणार आहे मी तुमच्या सोबत आहे आपला लढा यशस्वी होईल. गणेश मूर्तिकारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी सांगितले. या जाहीर सभेत पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर म्हणाले की, आत्ता न्यायालयीन लढाई शिवाय पर्याय नाही. गणेश मूर्तिकार्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत.
संघटीत रहा, आपसात भांडू नका. न्यायालयीन लढाई करिता सज्ज रहा, ही लढाई मोठी आहे. एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढा देऊ या. न्यायालयीन लढाई करिता उत्तमोत्तम कायदे तज्ञ वकिलांशी तुमची गाठ घालून दिली आहे. राजकीय नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे व ती जिंकायची आहे. आपला विजय निश्चित आहे असे धारकर यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला निलेश जाधव, महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, शिवसेनेचे माजी विधानसभा समन्वयक व पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर, मुंबई गणेश मूर्तिकार समितीचे सचिव सुरेश शर्मा, प्रविण बावधनकर, हमरापूर विभाग श्री गणेश उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष जयेश पाटील, माजी अध्यक्ष कृणाल पाटील, खजिनदार कैलास पाटील, सचिव राजन पाटील, नितीन मोकळ आदींसह शेकडोच्या संख्येने राज्यातील गणेश मूर्तिकार उपस्थित होते.