अलिबाग | रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या तीनविरा-वाघोली-वाघ्रण या ७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झाली आहे. रस्त्यास खड्डेच खड्डे पडले आहेत. डांबरी स्तराचा अंश उरलेला आहे. पादचारी व विद्यार्थ्यांना त्रास भोगावा लागत आहे. वाहनचालकांना खड्डे चुकविण्यासाठी मोठीच कसरत करावी लागते. त्यामुळे छोटे -मोठे अपघात होतात.
जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट असल्यामुळे जाब कोण विचारणार? तीनविरा-वाघोली-वाघ्रण हा खारेपाटातील गावांना जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. वडखळ-अलिबाग राष्ट्रीय महामार्गावरील तीनविरा येथे या रस्त्याची सुरूवात होते व कार्ले खिंड-रेवस या मुख्य रस्त्यास वाघ्रण येथे मिळतो. कार्लेखिंडमार्गे रेवस ऐवजी तीनविरा-वाघोलीवाघ्रण या रस्त्याने रेवस बंदराकडे गेल्यास ७ कि.मी. अंतर वाचते. शिवाय वेळ व इंधनाचीही बचत होते.
म्हणून पेण-पोयनाड कडून रेवससकडे जाणारी वाहने तीनविरावाघोली- वाघ्रण या रस्त्याचा पर्याय निवडतात. परिणामी या रस्त्याने सतत वाहतूक चालू असते. शिवाय या रस्त्याने वाघोली, सिद्धार्थ नगर (वाघोली), वीरवाडी, सुतारपाडा, लेभी, खिडकी, कोपर, भायमळा, बहिरमपाडा, कामार्ले, लोणघर, सातघर, वाघ्रण ही गावे जोडली गेली आहेत. सदर रस्ता खारेपाटातील अनेक गावांचा संपर्क रस्ता आहे. सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्याची दूरवस्था झाली आहे.
सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. प्रवाशांना सांधेदुखी, मानदुखी, पोटदुखी, ह्रदयकार इत्यादी आजार उद्भवले आहेत. जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट असल्यामुळे सर्वत्र अधिकारीवर्गाचेच साम्राज्य पसरले आहे. म्हणून जनसामान्यांची कीव करुन सदर रस्त्यास प्राधान्य द्यावे व खड्डेमुक्त प्रवास करावा अशी विनंती ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर याीं केली आहे.