पेण तालुका आमसभेत सामाजिक प्रश्नांना वाचा , एमएमआरडीए, पाणीटंचाई, उसर गेल पाईपलाईन विरोधात जोरदार चर्चा

By Raigad Times    26-Feb-2025
Total Views |
 pen
 
पेण | पेण तालुका आमसभेत अत्यावश्यक प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. एमएमआरडीए, पाणीटंचाई व उसर गेल पाईपलाईन विरोधात जोरदार चर्चा झाली. पेण तालुका पंचायत समिती अंतर्गत पेण तालुयाची आमसभा पेण शहरातील आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
 
या सभेला खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, पेण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल सूर्यवंशी, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रसाद म्हात्रे, माजी सभापती स्मिता पेणकर, माजी जि. प. सदस्य डी. बी. पाटील, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, नितीन परदेशी, आदिवासी खात्याचे प्रकल्प अधिकारी, बाजार समिती सभापती यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, तालुयातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
प्रारंभी विविध मान्यवरांचे अभिनंदन ठराव घेण्यात आले. तसेच मृत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अ‍ॅड. अच्युत पाटील यांनी सांगितले की, एमएमआरडीच्या नावाने पेण तालुयातील ८८ गावांतील जागा घेण्याचा डाव आहे. त्याला शेतकर्‍यांचा विरोध असल्याचा ठराव घ्यावा. नंदा म्हात्रे यांनी एमएमआरडीबाबत माहिती अधिकारात उत्तर मिळत नसल्याची तक्रार केली. हरिश बेकावडे यांनी शेतकर्‍याने फार्मसाठी जागा दिल्या; मात्र आता शेतकर्‍यांना वेठीस धरले जात असल्याचे सांगितले.
 
शाळांमध्ये जादा फी आकारली जात आहे. सरकारी शाळा का सुसज्ज बनवल्या जात नाहीत, असा प्रश्न देखिल उपस्थित कण्यात आला. आमसभेत वाशी खारेपाट, कासू, शिर्की, सोनखार, उरणोली व इतर भागांतील पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा सर्व्हिस रोड आणि जिते गावाजवळील सर्व्हिस रोड यांवर पडलेले खड्डे तातडीने भरले जावेत, अशी मागणी खारपाडा सरपंच यांनी केली.
 
याशिवाय वीज, रस्ते, पेण शहरातील कोंडाळ तलाव येथील बाधित कुटुंबांना घरकुल मिळाले नसल्याचा प्रश्न या वेळी नागरिकांनी मांडला. वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेतील लहान मुलींचे मृत प्रकरण या विषयावरदेखील जोरदार चर्चा करण्यात आली. आमदार रवींद्र पाटील यांनी जे दोषी असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश यावेळी दिले. आमसभेत मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी तातडीने कारवाई करुन हे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आदेश खासदार धैर्यशील पाटील व आमदार रवींद्र पाटील यांनी दिले.