कर्जत | तालुयात गोवंश हत्या आणि गोवंश यांची चोरी करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी धोत्रे परिसरातून जनावरांची तस्करी केली जात होती. त्यावेळी धोत्रे गावातील तरुणांनी गोवंश चोरून पळ काढण्याचा तयारीत असताना पाठलाग सुरू केला. शेवटी त्या गोरक्षक तरुणाचा मोठा तांडा मागे लागलेला बघून गुरे चोरणारे घाबरले आणि आपल्या गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खड्ड्यात कोसळली.
दरम्यान, या अपघातात तीन जनावरे मृत्यूमुखी पडली असून या गाडीचा चालक स्थानिक तरुणाच्या जिगरबाज कामगिरीमुळे पकडला गेला आहे, तर दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. महाशिवरात्री असल्याने धोत्रे गावातील तरुण हे शिव मंदिराची आरास करीत होते. त्यावेळी एमएच ०४ बी ४ अर्धवट नंबर असलेली गोल्डन रंगाची इनोव्हा गाडी गुरे घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यावेळी धोत्रे गावातील तरुणांनी आपल्या सोबतच्या दुचाकी घेऊन त्या इनोव्हा गाडीचा पाठलाग सुरू केला.
एकाच वेळी ३०-४० तरुण आपला पाठलाग करीत असल्याचे आणि ते जिगरबाज तरुण वेगाने पाठलाग करीत असल्याचे पाहून घाबरलेल्या इनोव्हा चालकाचा आपल्या गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे त्याची इनोव्हा गाडी खड्ड्यात जाऊन आढळली. त्यावेळी संधीचा फायदा घेऊन गुरे तस्करी साठी आलेले दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. गाडीचा चालक अपघातग्रस्त गाडीमध्ये अडकून पडल्याने जखमी झाला आणि तो धोत्रे गावातील तरुणांच्या हाती लागला.
या अपघातात त्या इनोव्हा गाडीमधील पाचपैकी तीन जनावरे यांचा गाडीला अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. एका गाडीमध्ये पाच जनावरे भरून नेली जात असल्याने जनावरांची कोंबून तस्करी सुरू असल्याने अपघातात त्यातील तीन जनावरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जनावरे सुस्थितीत आहेत.
या अपघाताची आणि गोवंश तस्करी करणार्या घटनेची माहिती कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत कशेळे येथील पोलीस आऊट पोस्ट येथे देण्यात आली. कर्जत पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. गाडीचा चालक आणि गाडी ही कल्याण येथील असून त्या सर्व पाच जनावरे यांची तस्करी करून त्या जनावरे यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याचे सिद्ध झाले आहे. धोत्रे आणि धोत्रे वाडी गावातील त्या सर्व तरुणांचे कौतुक बजरंग दलाचे कुलाबा जिल्हा अध्यक्ष साईनाथ श्रीखंडे यांनी केले आहे.