नवीन पनवेल | गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन टाटा मेमोरियल सेंटरच्या खारघर येथील कॅन्सर रुग्णालयामध्ये बहुउदेशीय वैद्यकीय सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे. तिथे आणखी ४५ हजार कॅन्सरग्रस्तांना वैद्यकीय उपचार मिळतील, असा विश्वास रुणालय प्रशासनाने व्यक्त केला आहे.
कॅन्सरवर वैद्यकीय उपचार घेणार्या रुग्णांच्या हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड तसेच इतर अवयवांवर काही परिणाम झाल्यास त्यांना इतरत्र पाठविण्यात येते. येथील नव्या बारा मजली बहुउद्देशीय इमारतीमध्ये समग्र उपचार देण्यात येणार आहेत. दीडशे खाटांची ही सुविधा पुढील तीन वर्षांमध्ये उपलब्ध होणार आहे.
खारघर येथील कॅन्सर रुग्णालयाचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी यासंदर्भात माहिती दिली. कॅन्सरग्रस्त रुग्णांना कॅन्सरमुळे विविध इतर आजारांचाही त्रास होतो. केमोथेरपीसारख्या उपचार पद्धतीमुळे इतर गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नांची गरज असते, याकडे डॉ. चतुर्वेदी यांनी लक्ष वेधले. राज्याच्या कानाकोपर्यातून अनेक रुग्ण उपचारांसाठी येतात.
इन्फोसिस फाऊंडेशनच्या सहकार्याने आशा निवास सुविधेंतर्गत मोफत वा अत्यल्प दरामध्ये तीनशे रुग्णांसह त्यांच्या काळजी घेणार्या कुटुंबियांसाठी निवास सोय उपलब्ध करण्यात आली आहे. या वर्षात २२० बालरुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. सात राज्यांतील रुग्णालयांमध्ये १ लाख २० हजार नव्या कॅन्सरग्रस्तांना उपचार दिले जातात.
रुग्णालयांचा विस्तार करताना नव्या १ हजार खाटा उपलब्ध होणार आहेत, असे टाटा कॅन्सर रुग्णालयाचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले. खारघर येथील कॅन्सर रुग्णालयाकडून संशोधनाला चालना देण्यात येणार आहे.सीएसआर निधीतून भारतातील सर्वांत मोठ्या रेडिएशन केंद्राची सुरुवात होईल.