कर्जत | १८९-कर्जत विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. तशा स्वरुपातील रिट पिटीशन सुधाकर परशुराम घारे यांच्याकडून दाखल करण्यात आली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी शिवसेनेचे उमेदवार, आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
महेंद्र थोरवे यांच्या निवडणूक विजयाला आव्हान देणारी ही याचिका असून, या याचिकेत शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी खोटा अपप्रचार, भ्रष्टाचार तसेच नामसाधर्म्य उमेदवार उभे करून चुकीच्या आणि भ्रष्ट पद्धतीने निवडणुकीमध्ये निसटता विजय मिळविला असल्याचे म्हटले आहे.
तसे पुरावे जमा करून अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी उच्च न्यायालयात याचिकेसोबत दाखल केले आहेत. याप्रकरणी १८ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी आहे. आ.थोरवे यांच्या विजयाला आव्हान देणारी ही याचिका दाखल केल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.