अलिबागचा औषधी पांढरा कांदा बाजारात दाखल

By Raigad Times    04-Feb-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारुपाला आलेल्या अलिबागचा पांढरा कांदा यंदा काढणीस सुरुवात झाली असून हा कांदा आता विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे. लहान कांदा २०० रुपये माळ तर मोठा कांदा २५० रुपये माळ अशा दराने सध्या हा कांदा विकला जात आहे. यंदा अवकाळी पावसामुळे पांढरा कांदा काहीसा उशिरा बाजारात आला आहे. अलिबाग तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये पांढर्‍या कांद्याचे पिक घेतले जात असे.
 
त्यानंतर आलिबाग तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढर्‍या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले. अलिबाग तालुक्यात २५० हेक्टरवर पांढर्‍या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. पांढर्‍या कांद्यांच्या काढणीचे काम सध्या वेगात सुरू असून वाळलेल्या कांद्याच्या वेण्या बनवण्याचे काम सुरू झाले आहे.
 
alibag
 
यातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. व्यापारी शेतकरयांच्या बांधावर येवून कांद्याची उचल करीत आहेत आणि नवीन कांद्याला चांगला भावदेखील मिळतो आहे. रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते; मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिक घेतली जात नाही.जिल्ह्यात ओलिताखालील क्षेत्र फारसे नसल्याने दुबार शेती फारशी केली जातनाही. पण अलिबाग तालुका त्याला अपवाद ठरतो.
 
भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने अलिबाग तालुक्यात पांढराकांदा यासारख्या पिकांची लागवड केली जाते. ज्यातून चांगले उत्पन्न शेतकर्‍यांना मिळते. या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्याने गेल्या काही वर्षात लगतच्या गावात पांढर्‍या कांद्याची लागवड केली जाऊ लागली.
 
यंदा पाउस उशिरापर्यंत पडल्याने पाणी मुबलक होते. पांढर्‍या कांद्याचा आकार मोठा असेल. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. सध्या लहान कांदा २०० रुपये माळ तर मोठा कांदा २५० रुपये माळ या दराने पांढरा कांदा विकला जात आहे. सुरवातीच्या हंगामात कांद्याचे दर चढे राहतील, नंतर आवक वाढल्यावर हे दर कमी होतील अशी अपेक्षा आहे.
अवकाळीचा फटका
यावर्षी झालेल्या अवकाळीचा फटका पांढरया कांद्याला बसला आहे.तामिळनाडूमध्ये किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवरदेखील जाणवला.
 
अवकाळी पाऊस झाल्याने लागवड उशिरा झाली, काही ठिकाणी कांद्याची रोपे कुजली शेतकरयांना पुनरलागवड करावी लागली होती. रोपांची वाढदेखील अपेक्षित झाली नाही. त्यामुळे पांढरा कांदा बाजारात दरवर्षीच्या तुलनेत उशिरा दाखल झाला आहे.
औषधी गुणधर्म
अभ्यासकांच्या माहितीनुसार या कांद्यात औषधी गुणधर्म आहेत. कांद्यात मिथाईल सल्फाईड, अमीनो अ‍ॅसिड हे घटक असतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. पोटातील उष्णता कमी होण्यासाठी कांदा उपयुक्त ठरतो.
बीजोत्पादन कार्यक्रम
अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला बाजारात मोठी मागणी आहे. परंतु सध्या केवळ २५० हेक्टर क्षेत्रावर याची लागवड होते. हे क्षेत्र वाढवण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
भौगोलिक मानांकन मिळाल्याने पांढर्‍या कांद्याला मागणी वाढली आहे. मुंबई पुण्यासारख्या महानगरातून कांद्यासाठी मोठी मागणी केली जात आहे. यंदा हवामान चांगले होते. त्यामुळे पिकही जोमाने आले आहे. कांद्याच्या काढणीला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसात कांदा बाजारात मुबलक प्रमाणात दाखल होईल. -सतीश म्हात्रे, शेतकरी, कार्ले