कर्जत | चौथीत शिकणारी खुशबू इतर मुलांप्रमाणेच शाळेत वावरत होती, खेळत होती, बागडत होती...१६ डिसेंबर रोजी शाळेत कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम झाला आणि या छोट्या मुलीचे वेदनादायी जीवन सुरु झाले. आरोग्य अधिकार्यांनी केलेल्या चुकीच्या निदानानंतर पुढच्या सात दिवसांत या गोंडस मुलीचा जीव गेला आहे.
तिच्या मृत्यूचे सोयरेसूतक आरोग्य यंत्रणा आणि प्रकल्प अधिकार्यांना नाही; परंतू किमान रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी या घटनेची चौकशी लावावी, अशी मागणी तिच्या घरच्यांनी केली आहे.पेण तालुक्यातील तांबडी गावातील नऊ वर्षांची आदिवासी मुलगी तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकत होती.
तेथील आश्रमशाळेत १६ डिसेंबर रोजी झालेल्या कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या हिवताव कुष्ठरोग निर्मूलन पथकाने चौथीमध्ये शिकणार्या खुशबू नामदेव ठाकरे हिला कुष्ठरोगी ठरवले होते. त्यानंतर कुष्ठरोगावरील गोळ्या घेतल्यावर खुशबूच्या अंगावर फोड्या आल्या, नंतर ताप आला. तसेच अंग सुजू लागल्याने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात तिला दाखल करावे लागले होते.
तेथे उपचार सुरु करण्याआधी खूशबूच्या कुष्ठरोग निर्मूलनाच्या गोळ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर उपचार घेत असताना खुशबू ठाकरे हिचा २२ जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. नऊ वर्षांच्या खुशबूला त्यापूर्वी कोणताही आजार नव्हता आणि तसे असताना खुशबूला कुष्ठरोगी ठरवून तिला गोळ्या देण्यात आल्या आणि त्याचा परिणाम तिच्या अंगावर फोड्या तसेच अंग सुजू लागले. चुकीचे निदान केल्याने खुशबूचा बळी गेला आहे.
त्यानंतर आदिवासी विभागाच्या अंतर्गत चालणार्या आश्रमशाळांच्या हलगर्जीपणाबद्दल प्रकल्प अधिकारी कार्यालयाने आश्रमशाळा प्रशासनाला केवळ ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. त्या नोटिसीला आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधिक्षिका यांनी अद्याप खुलासा दिलेला नाही. आरोग्य विभाग आणि शासकीय आश्रमशाळेकडून झालेल्या प्रकाराबाबद्दल प्रकल्प अधिकारी वरिष्ठ कार्यालयाला अहवालदेखील सादर करू शकले नाहीत.
त्यामुळे खुशबू ठाकरे मृत्यूप्रकरणी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्याकडून संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, छोट्या खुशबूच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अधिकार्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खुशबूच्या आईने केली आहे. या प्रकरणात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी लक्ष घालवे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.