अलिबाग | बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, शर्विकाचे पाय मात्र गडकिल्ल्यात दिसत आहेत. मुलं अंगणात रांगतात, बागडतात, शर्विका किल्ल्यांच्या पायर्यांवर आणि गडांच्या बुरुजावर रांगत मोठी झाली. मोठी म्हणजे किती? फक्त ७ वर्षांची...या इतकुशा वयात या मुलीनं तब्बल १२१ गडकिल्ल्यांना गवसणी घातली आहे. सह्याद्रीच्या या लेकीला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. तिच्या या कार्याची दखल भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली आहे.
इतकेच नव्हे तर तिला पुढील वाटचालीसाठी आर्थिक पाठबळदेखील देऊ केले आहे.शर्विका म्हात्रे हिचे अलिबाग तालुक्यातील लोणार-भुते हे गाव. वडील जितेन व आई अमृता म्हात्रे या दोघांनाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे आकर्षण. सह्याद्री या संस्थेच्या माध्यामातून त्यांनीदेखील गडकिल्ल्यांची सेवा सुरु केली. शर्विका अवघ्या दीड, दोन वर्षांची असल्यापासून ती आईवडिलांसोबत जायची.
अडीच वर्षांची असताना शर्विकाने सर्वांत आधी शिवरायांची राजधानी ‘किल्ले रायगड’ सर केला होता. यानंतर जणू तिने गड सर करण्याचा सपाटाच लावला. सह्याद्रीच्या कुशीतील मोठमोठे गड, किल्ले, त्यांचे सुळके बघून जिथे मुघलांच्या पोटात गोळा यायचा, त्याच किल्ल्यांच्या टोकाला छोटी शर्विका काही तासांत पोहोचते. शर्विकाच्या या अभूतपूर्व कामगिरीची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉडर्स’, एशिया बुक ऑफ रेकॉडर्स, इंडिया बुक ऑफ रेकॉडर्स, ओएमजी बुक ऑफ रेकॉडर्स आणि डायमंड बुक ऑफ रेकॉडर्स यासारख्या अनेक ठिकाणी करण्यात आली आहे.

पनवेलमधल्या सर्वांत उंच (९० अंश) कलावंतीण दुर्ग सर करणारी शर्विका ही राज्यातील सर्वांत लहान मुलगी ठरली आहे. नुकताच तिने लिंगाणा हा १२१ वा किल्ला सर केला. विशेष म्हणजे प्रत्येक गड-किल्ल्याच्या पायथ्याची माती तिने तिच्या घरी जपून ठेवली आहे. रोज या मातीचे कलश पूजन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे. महाराजांसोबत ज्या बहाद्दर सैनिकांनी आपले रक्त वाहिले, स्वराज्यासाठी बलिदान दिले आहे, त्यांचे रक्त इथल्या गडकिल्ल्यांच्या मातीत आहे. त्यामुळे ही माती माझ्यासाठी अत्यंत पवित्र असल्याचे शर्विका सांगते अवघ्या सात वर्षांच्या या मुलीला महाराजांबाबत इतकी माहिती कशी असू शकते? असा प्रश्न पडतो. शर्विकाचा हा प्रवास अत्यंत नैसर्गिकरित्या सुरू झाला आहे.
तिने कोणतेच शारिरीक प्रशिक्षण घेतलेले नाही. मात्र तिचे आई-वडिल आता तिच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाकडे लक्ष देत आहेत. शर्विका म्हात्रे सध्या पुणे येथे प्राथमिक शिक्षण घेत आहे. तिथे ती भिंत चढण्याचे (वॉल क्लायम्बिंग) प्रशिक्षण घेत आहे. अमोल जोगदाडे आणि मांतू मंत्री हे प्रशिक्षक तिला प्रशिक्षण देत आहेत. राजाच्या गड किल्ल्यांचा इतिहास जगासमोर पोहचवतानाच, देशासाठी खेळण्याचे तिचे स्वप्न ती पाहत आहे. शर्विकाच्या छोट्या पंखांची धडपड जेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पाहण्यात आली.
तेव्हा त्यांनी थेट अलिबागला तिचे घर गाठले. तिची चौकशी केली. खरे तर ते फक्त कौतुक करण्यासाठी घरी पोहचले होते. मात्र प्रत्यक्षात जेव्हा तिच्या पालकांच्या अर्थचक्राची माहिती घेतली तेव्हा चव्हाण यांना राहवले नाही. त्यांनी थेट स्वतःच्या खिशात आणि शर्विकाच्या पालकांच्या काळजाला हात घातला. गडकिल्ल्यांच्या प्रेमापायी शर्विकाचे आई-वडिल तिला सर्वतोपरी मदत करत आहेत. असेल नसेल तो पैसा, उसणेवारी करुन ते आपल्या लेकीचे प्रेम आणि छंद जोपासत आहेत. मात्र पुढची वाट अवघड असल्याचे ते सांगतात.
किल्ल्याच्या एका चढाईसाठी येणारा खर्च त्यांच्या हाताबाहेर जातो. रविंद्र चव्हाण यांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी लागलीच आर्थिक भार स्वतकडे घेतला आहे. एक वर्षासाठी सव्वा दोन लाखांची मदत त्यांनी शर्विकासाठी केली आहे. "तुम्ही करत असलेले काम खूप मोठे आहे. आर्थिक कारणामुळे हे काम थांबता कामा नये” असे सांगतानाच, "पुढील खर्चाचीदेखील काळजी करु नका” असा शब्द त्यांनी दिला आहे. गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. हे वैभव जगभर पोहचावे, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस खूपच आग्रही आहेत.
गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या कामात छोटी शर्विका एकप्रकारे खारीचा वाटा उचलत आहे. एक छोटीशी मुलगी, तिच्या सात वर्षांच्या आयुष्यात एवढ्या मोठ्या संख्येने गड-किल्ले सर करीत असेल, राजांचे काम जगासमोर नेत असेल तर उर्वरित आयुष्यात ती किती उंच कामगिरी करेल? याचा विचार फक्त रविंद्र चव्हाण यांनीच केला असावा, अन्यथा भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाचा राज्यातील प्रमुख नेता इकडे कशाला येईल?