कर्जत | कर्जत तालुक्यातील ठेकेदारानाचे सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरण तसेच राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे करोडोंची बिले थकीत आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील ठेकेदारांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. कर्जत ठेकेदार संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता यांना निवेदन देऊन आपली समस्या मांडली आहे. कर्जत तालुक्यातील विकास कामांच्या माध्यमातून सर्वत्र विकास दिसत आहे.
मात्र ज्या ठेकेदारांनी ही कामे घेतली आहेत. त्यांना सरकारले पैसेच न मिळाल्याने अनेकांवर घरच्या लक्ष्मीचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. अशा सर्व ठेकेदारानांची साधारण दीडशे कोटींची बिले सार्वजनिक बांधकाम विभागाकडे थकीत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून करारानुसार काम पूर्ण करुनही ठेकेदारांना देयके अदा करण्यात आलेली नाहीत.
त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कर्जत तालुक्यातील ठेकेदारांची सुमारे १५० कोटी रुपयांची बिले थकीत असून मागील दीड ते दोन वर्षांपासून निधी मिळत नसल्यामुळे ठेकेदारांनी विकासकामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.कर्जत ठेकेदार संघटनेने कामबंद आंदोलनाची भूमिका घेतली असून यासंदर्भातील निवेदने अधीक्षक अभियंता (कोकण भवन), कार्यकारी अभियंता (पनवेल) आणि उपअभियंता (कर्जत) यांना देण्यात आली आहेत. कर्जत तालुक्यातील ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळिंबकर, सचिव उदय पाटील, तसेच ठेकेदार संभाजी जगताप, भगवान चव्हाण, सूर्यकांत चंचे, अनंता नीलधे, शरद बडेकर, उमेश म्हसे, प्रमोद खडे, जब्बर शेख आदी उपस्थित होते.