धक्कादायक | तळा येथे गायीच्या पोटावर यशस्वी शस्त्रक्रिया , गायीच्या पोटात आढळले १८ किलो प्लास्टिक

पशुधन विकासच्या डॉक्टरांची कौतुकास्पद कामगिरी

By Raigad Times    08-Feb-2025
Total Views |
alibag
 
तळा/अलिबाग | भैय्या एक पिशवी दो...ताई एक पिशवी द्या...घरातून हात हलवत बाजारात गेल्यानंतर, पिशवीसाठी दुकानदाराकडे हात पसरण्याची घाणेरडी सवय, मुक्या जनावरांसाठी किती घातक ठरते? याचे उदाहरण रायगड जिल्ह्यातील तळा शहरात पहायला मिळाले. पुसाटी येथील एका गायीच्या पोटातून तब्बल १८ किलो प्लास्टिक काढण्यात आले.
 
गायीच्या पोटात इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पाहून शेतकर्‍यांसह डॉक्टर्सनाही धक्का बसला.तळा शहरातील पुसाटी येथे राहणारे मंदार पेंडसे या शेतकर्‍याच्या गायीचे पोट अवाढव्य फुगले होते. त्यामुळे पेंडसे यांनी तळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधला आणि गायीची माहिती दिली. यानंतर तळा पशुधन विकास अधिकारी डॉ.शिवाजी वाघ व अन्य टिमसोबत चर्चा केल्यानंतर गायीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
तळा पशुधन विकास अधिकारी डॉ. शिवाजी वाघ, सोनसडे पशुधन विकास अधिकारी डॉ. नितीन जाधव, पंचायत समितीचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारीडॉ. रघुनाथ पवार, संदीप नागोठणेकर व नामदेव जाधव यांनी गायीच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. यावेळी गायीच्या पोटातून जे बाहेर आले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. शस्त्रक्रियेदरम्यान गायीच्या पोटातून तब्बल १८ किलो प्लास्टिक बाहेर काढण्यात आले.
 
तसेच एक लोखंडी तारेचे वेटोळे आणि दोर्‍या आढळून आल्या. सरकारी डॉक्टरांच्या पथकाने रुमेनोटॉमी ही यशस्वी शस्त्रक्रिया करुन गायीला जीवदान दिले आहे. या पशुधन अधिकारी व त्यांच्या सहकार्‍यांचे कौतूक होत आहे. दरम्यान, सर्वत्र प्लास्टिक बंदीचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात जवळपास सर्वच शहरात प्लास्टिकच्या पिशव्या सहज मिळताना दिसत आहेत. या पिशव्या काम झाले की कुठेही फेकल्या जातात आणि मुक्या जनावरांचे आरोग्य धोक्यात येत असते.
पर्यावरण संरक्षणासाठी सामाजिक जागरुकता
प्लास्टिक प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे, ज्याचे परिणाम प्राणीमात्रांवर दिसून येत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सामाजिक जागरूकता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक संस्था आणि सरकारी संस्थांनी मिळून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम केले पाहिजे.
 
पर्यावरणीय समस्यांबद्दल जनजागृती करून लोकांना त्याचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे. विविध जनसंपर्क मोहीम, कार्यशाळा, शिबिरे आणि इतर शैक्षणिक उपक्रम आयोजित करून लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सुविधांची अवस्था सुधारणे या सर्व बाबींवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. या प्रयत्नांमुळे प्राणीमात्रांचे आरोग्य सुधारले जाऊ शकते.