ठेकेदारांची बिले रखडली! ‘जल जीवन मिशन’ला ब्रेक

By Raigad Times    01-Mar-2025
Total Views |
roha
 
रोहा | रोहा तालुक्यातील वरसे,तळाघर, देवकान्हे अन्य ग्रामपंचायतींमधीलबहुतेक जल जीवन मिशनच्या योजना ठेकेदारांना लाखो रुपयांचे बिले अदा न झाल्याने रखडल्याचे समोर आले आहे. अनेक योजना निव्वळ पंप व काही दुरुस्तीच्या कारणांत रखडल्यात. अंतिम टप्प्यात आलेल्या पाणी योजना ठप्प झाल्याने कित्येक गावांना ऐन उन्हाळ्यात पाणी नाही.
 
भीषण पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावगावचे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. हर घर जल कार्यक्रमांतर्गत जल जीवन मिशन योजनेच्या कामालाही आता ठेकेदारांच्या रखडलेल्या बिलाने ग्रहण लागले आहे. अनेक जल जीवन मिशन योजना अंतिम टप्प्यात आहेत.
 
मात्र ठेकेदारांना कामाचे पैसेच मिळाले नसल्याने अंतिम किरकोळ कामे तशीच ठेवलीत. याचा फटका तालुक्यातील तळाघर, पुगांव, देवकान्हे, भातसई, लांढर मुख्यतः बहुचर्चित वरसे ग्रामपंचायत यांसह अन्य गावांच्या योजनेला बसला आहे. जिल्ह्यात जल जीवन मिशनची गंभीर स्थिती आहे. तालुक्यांतील अनेक योजनांची कामे अत्यंत निकृष्ट झालीत.
  
योजना बिलांमुळे रखडल्या आहेत. शहर व तालुक्यातील विकासकामांत गोंधळाची स्थिती आहे. कोणता विकास, कोणासाठी, काय चाललेय हेच कळत नाही. यातच आता जल जीवनची भर पडली. योजनांची कामे निकृष्ट झालीत. अंतिम कामे रखडलीत. नळाला पाणी येईना....दखल कुणी घेईना...त्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत. याविषयी पंचायत समितीचे अभियंता युवराज गांगुर्डे यांनी ठेकेदारांची उर्वरीत बिलेच अदा न झाल्याने ही स्थिती ओढवली आहे. किरकोळ कामेही करत नाहीत. बिल अदा होण्यासाठी निधी नाही. आम्ही काय करणार? अशी प्रतिक्रिया दिली.