अलिबागच्या समुद्रात मच्छिमार बोटीला आग , सुदैवाने १५ खलाशी बचावले

तटरक्षक दलाच्या मदतीने खलाशांना सुखरुप काढले बाहेर

By Raigad Times    01-Mar-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | अलिबागजवळच्या खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटीला आग लागली. या दुर्घटनेत ९० टक्के बोट जळून खाक झाली असून या बोटमालकाचे १ कोटी ८० लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने बोटीवर असलेल्या १५ खलाशांचा जीव वाचला आहे. तटरक्षक दलाच्या मदतीने सर्व खलाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
 
अलिबागच्या साखर गावातील ‘एकविरा माऊली’ ही बोट समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) पहाटे मासेमारी करुन परतत असताना बोटीला अचानक आग लागली. बोटीवरील खलाशांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचे प्रयत्न असफल ठरले.
 
आगीचे लोट वाढताना दिसताच खलाशांनी समुद्रात उड्या घेतल्या व दुसर्‍या बोटीने किनार्‍यावर आले. यामध्ये तटरक्षक दलाने मदतकार्य केले. या आगीत बोटीतील जाळी, मासेमारीसाठी लागणारी अवजारे जळून खाक झाली. समुद्रातील बोट किनार्‍यावर आणण्यासाठी एक एक करीत सर्व मच्छिमार प्रयत्न करु लागले होते. बोटीतील यंत्र सामुग्री निकामी झाली असून, स्थानिकांच्या मदतीने बोट किनार्‍यावर आणण्यात आली.
बोटमालकाचे १ कोटी ८० लाखांहून अधिक नुकसान
पहाटेच्या सुमारास बोटीला आग लागल्याचे आम्हाला कळताच आम्ही दुसर्‍या बोटीने घटनास्थळी पोहोचलो. तोपर्यंत बोट पूर्ण जळून खाक झाली होती. बोटीचा केवळ सांगाडा उरला आहे. या बोटीला खेचत जेटीवर आणले.
 
या दुर्घटनेमुळे आमचे १ कोटी ८० लाखांचे नुकसान झाले आहे. आधीच आम्ही कर्जबाजारी आहोत, त्यात पुन्हा आता आमच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. - राकेश गण, बोटीचे मालक
शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास या बोटीला आग लागली. त्यानंतर आमचे अधिकारी पोहोचले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्कीटने आग लागल्याचा अंदाज आहे. पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले आहे. - संजय पाटील, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय