राज्यातील 10 वी, 12 वीचे वर्ग प्रायोगिक तत्वावर पाच ऑगस्टपासून सुरु – राज्यमंत्री बच्चू कडू

0
722

मुंबई / अमरावती : राज्यातील 10वी, 12 वीचे वर्ग पाच ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. तसेच 21 जुलैपासून पाचवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. पहिली, दुसरीच्या ऑनलाईन शिक्षणावर बंदी आहे. तर सक्तीने शुल्क वसुली करणार्‍या शाळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.


सध्याच्या परिस्थितीत शिक्षण सुरु करण्यासंदर्भात अमरावती येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
खासगी शाळांनी सर्व वर्गांचे ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. यामुळे खासगी आणि शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विषमता वाढेल. यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाच्या शाळाही सुरु होणे गरजेचे आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात दहावी आणि बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु होणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील एक शाळा सुरु करण्याचे नियोजन करावे. शाळा सुरु करण्यासाठी येणार्‍या अडचणी दूर करुन इतरही ठिकाणच्या शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेण्यात यावा. यासाठी त्रयस्थ म्हणून गावातील सरपंच किंवा समिती सदस्यांची मदत घ्यावी, असे ते म्हणाले.

1.19 लाख विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची सोय नाही
प्रत्यक्ष शिक्षण पद्धती इतर कोणत्याही पर्यायापेक्षा जास्त प्रभावी आहे. परंतु सध्यास्थिती लक्षात घेता इतर वर्गाच्या शाळा ऑनलाईन सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. अमरावती विभागात सुमारे एक लाख 19 हजार विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही. त्यांच्यापर्यंत कशाप्रकारे शिक्षण पोहोचविता येईल, याचाही विचार होणे गरजेचे आहे. तसेच विलगीकरणासाठी शाळा उपयोगात आणल्या आहेत, या शाळा पुन्हा ताब्यात घेतेवेळी निर्जंतुकीकरण करून घ्याव्या लागतील, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here