कर्जत तालुक्यात आज कोरोनाचे 11 रुग्ण; चौघांचा मृत्यू

0
767

बाधित रुग्णांची संख्या 454 वर

कर्जत : कर्जत तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागालाही कोरोनाने घेरले आहे. आज (28 जुलै) नवीन 11 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृतांची संख्या 16 वर गेली आहे. तालुक्यात आजअखेर कोरोना बाधित रुग्णांची संख्या 454 झाली असून, 336 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

आज कर्जत शहरातील दहिवली भागातील एका 61 वर्षांच्या व्यक्तीचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ही व्यक्ती येथील विठ्ठल मंदिर संस्थानची विश्वस्त आहे. कर्जत शहरातील एसटी आगार परिसरात राहणार्‍या एका कुटुंबातील 35 वर्षीय महिला व 11 वर्षांच्या मुलीचा तसेच 51 वर्षीय, 43 वर्षीय पुरुषांचा व 15 वर्षांच्या मुलाचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. बारणे – साळोख परिसरातील 43 वर्षांच्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली आहे.

कर्जत शहरातील एक ज्वेलर्सचे दुकान असलेल्या 43 वर्षीय आणि मोबाईलचे दुकान चालविणार्‍या एका 46 वर्षांच्या व्यक्तीचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तसेच कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून मुद्रे भागात राहणार्‍या एक 31 वर्षीय युवतीलाही कोरोनाची बाधा झाली आहे.

आज मृत जाहीर केलेल्या रुग्णांमध्ये कर्जत नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, मानिवली ग्रामपंचायतीचे सरपंच, कर्जत शहरातील प्रसिद्ध वडा पाववाले आणि कळंब येथील 65 वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. दरम्यान, आजअखेर नोंद झालेल्या तालुक्यात 454 बाधित रुग्णांपैकी 336 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 102 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here