आ. प्रविण दरेकर यांनी घेतला पाणीटंचाईचा आढावा

28 May 2019 13:47:44
 

पोलादपूर | राज्यातील पाणीटंचाईप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-सेना युतीचे सरकार अतिसंवेदनशील असून पोलादपूरातील पाच गावांना प्रत्येकी एक पाच हजार लिटर्स साठवण क्षमतेची टाकी भाजपतर्फे देण्यात येईल, अशी माहिती भाजपचे मुंबई सरचिटणीस विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकर यांनी दिली. तालुक्यातील टंचाईग्रस्त गांवे आणि वाडयांचा आढावा आ. प्रवीण दरेकर यांनी प्रथम विश्रामगृहामध्ये कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करून त्यानंतर तहसिलदार प्राजक्ता घोरपडे यांच्या दालनामध्ये निवासी नायब तहसिलदार समीर देसाई, पंचायत समितीचे शाखा अभियंता कांबळे यांच्यासोबत पोलादपूर तालुक्याचा पाणीटंचाई निवारण कृती आराखडा यावर आढावा घेतला. यावेळी तहसिलदार प्राजक्ता घोरपडे यांनी, तालुक्यात ५ हजार लिटर्स क्षमतेचे दोन टँकर्स आणि १० हजार लिटर्स क्षमतेचे दोन टँकर्स कार्यरत असून तीन दिवसांच्या अंतराने २८ गावे व ६७ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून २९ बोअरवेलची मंजूरी असल्याची माहिती दिली. विद्युतबिले कारणास्तव योजना बंद पडल्या असल्याची माहिती देण्याबाबत असमर्थता व्यक्त केली.यावेळी माजी उपसभापती नारायण अहिरे, प्रसन्ना पालांडे, कृष्णकांत दरेकर, नीलकंठ दरेकर, कोतवाल बुद्रुक सरपंच गणेश कदम, समाधान शेठ, राजू धुमाळ, भारती कदम, राजेश कदम, मंगेश शिंदे तसेच अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0