- आतापर्यंत 346.92 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
- भात, नाचणी, वरी पिकांचे मोठे नुकसान
माणगांव । माणगांव तालुक्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेती पाण्याने भरुन गेली आणि भातपिक पाण्याखाली राहिल्याने कुजले आहे. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटात हिरावला गेल्याने शेतकरी रडकुंडीला आले आहेत. अशा नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या भातशेतीचे पंचनामे करण्यास सुरु आहेत.
कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढे भातपिक घेण्यासाठी घेण्यासाठी शेतकरी वर्षभर शेतात काबाडकष्ट करतो. महागडे बी-बियाणे व खत शेतात टाकून मशागत करतो. यंदा भातपिक चांगले बहरले होते. त्यामुळे कापणी करुन भात घरी आणण्याच्या तयारीत असताना आलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्याच्या तोंडून घास काढून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे.
माणगांव तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने 12 हजार 295 हेक्टरवर भातपिक लागवड करण्यात आली होती. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने शेती पाण्याने भरुन गेली. सलग पडलेल्या पावसामुळे पाणी शेतात साचून राहिले. परिणामी काही ठिकाणी भातपिक पाण्याखाली गेले, तर काही शेतकर्यांचे पिक वाहुन गेले. अनेकांच्या शेताचे बांध फुटले. त्यामुळे भात पिकाबरोबरच वरकस जमीनीवरील नाचणी, वरी ही पिकेही वाहुन गेली. त्यामुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले.
माणगाव तालुक्यात बहुतांशी शेती एक पिकी आहे. त्यामुळे शेतकरी या खरीप हंगामाच्या भातपिकावर आपली उपजीविका चालवितो. या शेतकर्याला दुबार पिकही घेता येत नाही. त्यामुळे या भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे शासनाने कोणतीही हयगय न करता करावेत व शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांमधून केली जात आहेत.
तालुक्यात 19 ऑक्टोंबरपासून नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे शासनाने सुरु केले आहेत. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त पंचनाम्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत 346.92 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरु आहे. माणगावात नगरपंचायत धरुन 187 गावांतील नुकसान झालेले नजर अंदाजाचे क्षेत्र 1195.35 हेक्टर आहे. त्यातील शेतकरी संख्या 2 हजार 895 असून आतापर्यंत 76 गावांतील पंचनाम्याची कामे पूर्ण झाली झाली आहेत. तर 1 हजार 758 शेतकर्यांचे पंचनामे झाले आहेत.
दरम्यान, माणगाव तालुक्यात केवळ 33 टक्केच पिकाचे नुकसान झाले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
------------------------------------------------------------
गावे मोठी तसेच क्षेत्रही जास्त असल्यामुळे पिकाचे पंचनामे करण्याला थोडा विलंब लागत आहे. दररोज केलेल्या पंचनाम्याचा आढावा घेत असून पिकाच्या नुकसान भरपाईचे पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर करा, अशा सूचना संबंधित कर्मचार्यांना दिल्या आहेत.
- रविंद्र पवार, कृषी अधिकारी, माणगाव