- सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
- 8 दिवसांत कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा
अलिबाग । अलिबाग तालुक्यातील तिन्ही मुख्य रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे. आठ दिवसांत कार्यवाही झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही सार्वजनिक बांधकाम खात्याला दिला आहे.
पंडित पाटील यांनी आज (29 ऑक्टोबर) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता आर.एस. मोरे यांची भेट घेत, या रस्त्यांच्या दूरवस्थेकडे लक्ष वेधले. अलिबाग-सुडकोली-रोहा, पोयनाड-नागोठणे, मुरुड-अलिबाग या तीनही प्रमुख रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. हे रस्ते खड्ड्यांमध्ये हरवले असनू, यावरुन प्रवास करताना प्रवासी, वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. याबाबत माजी आमदार पंडित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
वारंवार मागणी करुनही या रस्त्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने, या मार्गावरुन दैनंदिन प्रवास करणार्या वाहनचालक, प्रवाशांच्या कंबर, मानेच्या आजारांनी ग्रासले आहे. रात्रीच्या वेळी प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यांच्या नुतनीकरणाचे काम तातडीने सुरु करण्याच्या मागणी शेकापच्यावतीने करण्यात आली. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन सा.बां.चे कार्यकारी अभियंता आर.एस.मोरे यांना देण्यात आले आहे. यावेळी त्यांनी अलिबाग-सुडकोली-रोहा रस्त्याची 6 नोव्हेंबरपासून दुरुस्ती करण्यात येणार असल्याची लेखी माहिती दिली. याप्रसंगी तालुका चिटणीस अनिल पाटील, ज्येष्ठ नेते अनंत देशमुख, सवाई पाटील, शहर चिटणीस अशोक प्रधान, नगरसेवक अनिल चोपडा, अजय झुंजारराव, सिद्धनाथ पाटील, अनिल गोमा पाटील, मनोज ओव्हाळ, विक्रांत वार्डेे, पाटील, गोसावी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.