कल्याण : महावितरणच्या पालघर विभागात वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. ७ ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या या मोहिमेत ६११ वीज जोडण्यांची तपासणी करून ८२ जणांकडील वीजचोरी उघडकीस आणली आहे. जवळपास सव्वादहा लाख रुपयांच्या ६६ हजार युनिट वीज चोरीप्रकरणी संबंधितांविरुद्ध विद्युत कायदा- २००३ अन्वये कारवाई सुरु आहे. ही मोहीम नियमित सुरु राहणार असून कटू कारवाई टाळण्यासाठी अधिकृत जोडणी घेऊनच वीजवापर करावा व मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.
पालघर विभाग कार्यालयांतर्गत पालघर, बोईसर ग्रामीण व एमआयडीसी, डहाणू, जव्हार, सफाळे, तलासरी, मोखाडा आणि विक्रमगड उपविभागातील ६११ वीजजोडण्यांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली. यात ७८ ठिकाणी वीजचोरी तर चार ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर सुरु असल्याचे आढळून आले. याशिवाय ११ ग्राहकांच्या मीटर रीडिंगची अचूक नोंद त्यांच्या वीजबिलात झाली नसल्याचे निदर्शनास आले. ६६ हजार युनिट वीज चोरी प्रकरणी संबंधीत ७८ जणांविरुद्ध विद्युत कायदा-२००३ च्या कलम १३५ तर चार जणांविरुद्ध कलम १२६ नुसार कारवाई करण्यात येत आहे.
वीजचोरी संदर्भात जवळपास १० लाख १७ हजार रुपयांची वीजबिले भरण्याची नोटीस संबंधितांना बजावण्यात येत असून या वीजबिलाचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी फिर्याद देण्यात येईल. वीजचोरीला प्रतिबंध करण्यासाठी ही मोहीम नियमितपणे राबविण्यात येणार आहे. मोहिमेत वीज मीटरमधील छेडछाड शोधून अचूकपणे वीजचोरी पकडण्यासाठी ऍक्यूचेक मीटरचा वापर करण्यात येत आहे.