पायर्या चढताना चक्कर येऊन कोसळले...
महाड । किल्ले रायगडावर शिवभक्ताचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रमेश तुकाराम गुरव असे या शिवभक्ताचे नाव आहे. पायर्या चढत असताना अचानक चक्कर येऊन ते पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.
आज (17 नोव्हेंबर) सकाळी ही घटना घडली. रमेश गुरव (वय 41, रा. विद्याविहार, मुंबई) हे विद्याविहार येथील आपल्या अन्य सहा मित्रांसह किल्ले रायगडावर पणत्या लावण्यासाठी आले होते. आज सकाळी नऊ वाजता त्यांनी पायर्यांनी गड चढण्यास सुरुवात केली.
सुमारे शंभर-सव्वाशे पायर्या चढून गेल्यानंतर रमेश गुरव यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना आकडी आली आणि चक्कर येऊन ते कोसळले. त्याच्या सहकार्यांनी त्यांना उपचारासाठी तातडीने पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी गुरव यांना महाड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.