उरण : नाल्यात पडून कामगाराचा मृत्यू

By Raigad Times    26-Nov-2020
Total Views |
Accident_Uran_1 &nbs
 
सुरक्षेची काळजी न घेता सुरु असलेल्या कामामुळे दुर्घटना
 
अनंत नारंगीकर/जेएनपीटी । उरण शहराच्या प्रवेशद्वाराजवळील चारफाटा येथील नाल्यात पडून एका हॉटेल कामगाराचा मृत्यू झाला. सिडकोकडून या नाल्याचे खोलीकरण आणि बांधकाम सुरु आहे. मात्र ठेकेदाराने या कामाच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने ही दुर्घटना घडल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
 
प्रमोद दळवी (वय 50) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तो मूळचा महाड येथील राहणारा असून उरण शहरातील हॉटेलमध्ये नोकरी करत होता, असे पोलिसांनी सांगितले. उरण शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सिडकोमार्फत गेल्या अनेक दिवसांपासून नाल्याचे काम सुरु आहे. मात्र अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी कोणत्याही सुरक्षेच्या साधनांशिवाय हे काम सुरु आहे. या असुरक्षित कामामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र याकडे सिडकोकडून दुर्लक्ष झाले.
 
अखेर आज याठिकाणी एका गरीब कामगाराला जीव गमवावा लागला. रात्रीच्या अंधारात या नाल्याचा अंदाज न आल्याने प्रमोद दळवी या नाल्यात पडले. मात्र रात्रीची वेळ असल्याने ही बाब कोणाच्या निदर्शनास आली नाही. त्यामुळे पाण्यात बुडून दळवी यांचा मृत्यू झाला. आज ही घटना उघडकीस आली. या घटनेप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
दरम्यान, कामाच्या ठिकाणी सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे सिडको आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.