अलिबाग : मधमाश्यांच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू; घोडेमालकासह दोनजण जखमी

By Raigad Times    29-Nov-2020
Total Views |
honey bee house_1 &n 
 
वरसोली येथील घटना
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यातील वरसोली गावामध्ये मधमाश्यांच्या हल्ल्यात एका घोड्याचा मृत्यू झाला असून, दोनजण जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (26 नोव्हेंबर) दुपारी घडली.
 
वरसोली समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांच्या मनोरंजनासाठी घोडेस्वारीचा व्यवसाय करणार्‍या योगेश वरसोलकर यांचा वरसोली येथे तबेला आहे. त्या तबेल्याशेजारी असलेल्या झाडावर मधमाश्यांचे पोळे होते. ते पोळे एका पक्ष्याने फोडले. त्यामुळे त्यातील मधमाशा सैरावैरा उडू लागल्या.
 
या मधमाश्यांनी वरसोलकर यांच्या तबेल्यातील घोड्यांवर हल्ला केला. त्यामुळे घोडे मोठमोठ्याने ओरडत विव्हळू लागले. त्यांच्या आवाजाने वरसोलकर यांनी तबेल्याच्या दिशेने धाव घेत, मधमाश्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र या मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले. तसेच त्यांच्या वाडीतील आणखी एकजण या मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झाला.
 
या मधमाश्यांच्या हल्ल्यात वरसोलकर यांच्या तबेल्यातील एका घोड्याचा मृत्यू झाला. डॉक्टर उपचार करत असतानाच, या घोड्याने आपला प्राण सोडला. तर जखमी वरसोलकर यांच्यासह अन्य एका जखमीवर उपचार करुन त्यांना सोडून देण्यात आले आहे.