अर्णव गोस्वामी यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला म्हणून कोणी गळे काढण्याची गरज नाही - एस.एम. देमुशख

By Raigad Times    04-Nov-2020
Total Views |
 Arnab Goswami Arrest_1&nb
 
कायद्याला त्याचे काम करु द्यावे...
 
अलिबाग । रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध यासाठी करता येणार नाही की, हे प्रकरण व्यक्तीगत आहे. त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयाने संबंध नाही. त्यामुळे अर्णव यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणत कोणी गळे काढण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे. कायद्याला त्याचे काम करु द्यावे हेच उचित ठरेल, असेही ते म्हणाले.
 

S M Deshmukh_1   
 
मे 2018 मध्ये अलिबाग तालुक्यातील काविर येथील वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांनी आत्महत्या केली होती. अर्णव गोस्वामी यांच्याकडून कामाची मोठी रक्कम येणे होती; पण ती ते देत नसल्याने ही आत्महत्या झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. गोस्वामी यांच्याविरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता; पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे नाईक कुटुंबियांनी या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली होती.
 
Arnab Goswami Arrest_1&nb
 
त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली. या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयानेदेखील संबंध नाही. दोघांच्या मृत्यूचा हा विषय असल्याने या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही. पत्रकारितेची झुल पांघरुण वाट्टेल तसे उद्योग करणार्‍यांची पाठराखण मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करु शकत नाही.
 
कायद्याला त्याचे काम करु द्यावे हेच उचित ठरेल. अर्णव गोस्वामी यांनी पत्रकारितेचे सर्व संकेत पायदळी तुडवले असून पत्रकारिता कशी नसावी? याचा नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे. त्यांची पत्रकारिता समर्थनीय नाही असे आम्हाला वाटते, असेही एस.एम.देशमुख यांनी म्हटले आहे.