- जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींची निवड
- पंचतत्त्वांच्या आधारे राबविले जाणार अभियान
अलिबाग : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातही या अभियानाला सुरुवात झाली आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वांच्या आधारे हे अभियान राबविले जाणार असून, यात जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी आजपासून अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींचा झपाट्याने विस्तार होत आहे. या गावांतील पर्यावरणाचा समतोल साधावा, या हेतूने 1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत या अभियानांंतर्गत पंचतत्वानुसार चांगली कामे करणार्या गावांचा गौरव केला जाणार आहे. माझी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, अर्थ व बांधकाम समिती सभापती नीलिमा पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, समाजकल्याण समिती सभापती दिलीप भोईर, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे.
अभियानात करण्यात येणारी कामे
अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल. त्यामध्ये पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे या मुद्यांशी संबंधित कामे केली जातील. तर वायू तत्त्वासाठी प्रदूषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनार्याची स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. आकाश तत्त्वातील स्थळ व प्रकाशाने मानवी स्वभावात होणार्या बदलांसाठी जनजागृती करणे, यावर भर दिला जाईल.
अभियानात निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायती
‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये रावे, पळस्पे, केळवणे, वहाळ, पाली देवद, विचुंबे, गव्हाण, चिरनेर, वरसोली, थळ, रेवदंडा, चौल, मोर्बा ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
-----------------------------------------------------------------------
अभियानासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये आजपासून कामे सुरु करण्यात आली आहेत. सर्व गावांचे ‘गाव कृती आराखडे’ तयार करुन त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना शपथ देण्यात येणार आहे. सर्वांनी श्रमदान करुन यात आपला सहभाग नोंदवावा.
- डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड
-----------------------------------------------------------------------