नोकरीत सामावून घेण्यासाठी गुरुवारपासून साखळी उपोषण
खोपोली : स्थानिकांना रोजगार देण्याच्या मुद्द्यावरून साजगाव ग्रामस्थ आणि आलाना कंपनी सहा वर्षानंतर पुन्हा समोरासमोर आले आहेत. स्थानिकांना नोकरीत सामावून घ्यावे, यासाठी साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. गुरुवार (३ डिसेंबर)पासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषण केले जाणार असल्याची माहिती सरपंच अजित जाधव यांनी दिली आहे.
खालापूर तालुक्यातील सारसन येथे तेलाचे उत्पादन करणारा आलाना फ्रिगोरी फिको हा कारखाना आहे. या कारखान्याला स्थानिकांचे वावडे असून सहा वर्षांपूर्वी उपोषण केल्यानंतर दहा स्थानिक तरुणांना कंपनीने नोकरीत सामावून घेतले होते. या कामगारांना सहा वर्षांनंतरही कोणतेही काम न देता बसवून ठेवत कामगारांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाने केल्याचा आरोप आहे. सहा वर्षे होऊनही या कामगारांना कायम करण्यात आलेले नाही. सहा वर्षांपूर्वी २० जणांना नोकरीत घ्यायचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले होते. मात्र हे आश्वासन आजवर पाळण्यात आलेले नाही.
कंपनीचा नवीन प्लांट सुरू झाला असून या नव्या प्लांटमध्ये जास्तीत जास्त स्थानिकांना सामावून घ्यावे, सहा वर्षांपूर्वी शब्द देऊनही न घेतलेल्या दहा स्थानिक तरुणांना नोकरी द्यावी, सध्या काम करत असलेल्या कामगारांना कायम करून कंपनीत काम द्यावे, संपूर्ण प्रकल्पात स्थानिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे. यासाठी व्यवस्थापनाबरोबर अनेक बैठका झाल्या असून सकारात्मक मार्ग न निघाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
“आलाना कंपनीला सर्व प्रकारचे सहकार्य करूनही कंपनी स्थानिक तरुणांना रोजगार देण्यास टाळाटाळ करत असल्याने साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. स्थानिकांना रोजगार मिळाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. - अजित जाधव, सरपंच साजगाव”