मुंबईकडे जाण्याचा प्रवास मांडवा पोलिसांनी केला सुखकर
अलिबाग : गेल्या दोन दिवसांपासून अलिबागचे किनारे पर्यटकांनी गजबजले होते. विकेंड एन्जॉय केल्यानंतर आज (१३ डिसेंबर) दुपारनंतर पर्यटकांनी परतीचा मार्ग पकडला. त्यामुळे सायंकाळी अचानक मांडवा जेट्टी येथून मुंबईकडे जाण्यासाठी पर्यटक, प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
प्रवाशांच्या तुलनेत लाँच सेवा अपुरी पडत होती. त्यात भरीस भर म्हणून एका बाजूची फ्लोटींग जेट्टी बंद असल्याने एकाच बाजूच्या फ्लोटींग जेट्टीवरुन प्रवासी वाहतूक सुरु होती. त्यामुळे जेट्टीवर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे ७ हजार ते ८ हजार प्रवासी रांगेत उभे होते.
वाढती गर्दी पाहून गोंधळ निर्माण होऊ नये, म्हणून मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके तसेच १५ पोलीस अधिकारी-कर्मचारी, २ एमएमबीचे अधिकारी यांनी या प्रवाशांना मुंबईकडे जाण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
जादा लाँच उपलब्ध करून देण्यात आल्या. काहींना स्पीड बोटीने मुंबईकडे रवाना करण्यात आले.
मांडवा पोलिसांनी अत्यंत चोख कामगिरी बजावून योग्य बंदोबस्तामध्ये अतिरिक्त बोटी मागवून सर्व प्रवाशांना सुखरूप मुंबईकडे रवाना केले. गर्दीत चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी प्रवाशांना रांगेत उभे करून एक-एक करत बोटीत सोडण्यासाठी मांडवा जेट्टीवर काम करणारे स्थानिक यांची मोठी मदत झाली. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, गर्दीचा फायदा घेऊन मांडवा आणि रेवस जेट्टी येथून कोणीही मराठा आंदोलक जाऊ नये, यासाठी मांडवा पोलिसांचे कटाक्षाने लक्ष होते.