वार्यावर सोडून दिलेल्या प्रवाशांना पोलिसांनी दिला मदतीचा हात
अलिबाग । मुंबई-अलिबाग जलमार्गावर चालणार्या रो-रो बोट व्यवस्थापकांची मुजोरी आता प्रवाशांवरदेखील वाढत आहे. याचा फटका परवा काही प्रवाशांना बसला. आगामी बुकींग घेऊनही वेळेआधीच ही बोट प्रवाशांना ठेवून निघून गेली. मांडवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी माणुसकी दाखवली आणि या प्रवाशांना मुंबईकडे रवाना केले. अन्यथा राडा होण्याची वेळ आली होती.
मांडव्यावरुन मुंबईला जाण्यासाठी 15 ते 16 लोकांनी रविवारी (27 डिसेंबर) रात्री 10 वाजताच्या रो-रो बोटीचे बुकींग होते. 10 वाजायला पंधरा-वीस मिनिटे असतानाच हे प्रवासी मांडवा जेट्टीवर दाखल झाले. पाहतात तर काय? रो रो बोट निघून गेली होती. रात्रीची वेळ...महिला, लहान मुलांसह सर्वच प्रवासी रडकुंडीला आले होते. संतापही व्यक्त होत होता. जेट्टीवरचे रिक्षा चालक या प्रवाशांना धीर देत होते.
आगाऊ तिकीट बुकींग केलेली होती. प्रवासी वेळेत पोहचले होते, असे असताना 10 वाजता सुटणारी बोट अर्धा तास आधी सोडलीच कशी? असा सवाल प्रवासी उपस्थित करीत होते. अत्यंत स्फोटक परिस्थिती निर्माण होत होती. याबाबतची माहिती मांडवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांना कळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्रथम त्यांनी प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी ‘रो-रो’च्या व्यवस्थापकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘बोट सुटली आहे, आता काहीही करता येणार नाही’ असे बेजबाबदार उत्तर देऊन बोट मुंबईच्या दिशेने निघून गेली.
मुंबईत रात्री 11 नंतर संचारबंदी असल्यामुळे बोट लवकर सोडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र बोट लवकर सुटणार होती तर तिकीट देतानाच ही माहिती का देण्यात आली नाही? असा सवाल प्रवाशांनी केला.
मांडव्याचा किनारा आणि थंडीत कुडकुडणारी महिला व लहान मुले पाहून शेवटी पोलीस अधिकारी सोनके यांनीच माणुसकी दाखवली. त्यांनी या प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
त्यांनी दोन स्पीड बोट मागवून घेतल्या. सोबत पोलीस कर्मचारी दिले आणि या प्रवाशांना मुंबईला सुखरुप सोडण्यात आले.
यानंतर प्रवाशांनी मांडवा पोलीस आणि स्थानिकांना धन्यवाद दिले. तसेच रो-रो बोट व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.