कोळीवाडा सीमांकनाबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक

By Raigad Times    04-Dec-2020
Total Views |

aditya thakre_1 &nbs
 
मुबई : कोळीवाडा सीमांकनासंदर्भात पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.
 
कोळीवाड्यातील समस्या व त्यावरील उपाययोजना यावर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. कोस्टल झोन प्राधिकरण, मुंबई महापालिका, पर्यावरण विभाग आदी संबंधीत सर्व विभागांनी यासंदर्भात समन्वयाने काम करावे, असे निर्देश मंत्री श्री. ठाकरे यांनी दिले. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर येथील यासंदर्भातील आढावा यावेळी घेण्यात आला.
 
अंतीम सीमांकन होईपर्यंत ग्रे क्षेत्रातील लोकांना हलवू नये अशी विनंती तेथील नागरिकांनी केली आहे. याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यासंदर्भात तशा सूचना मुंबई महापालिकेला देण्यात येतील, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
 
मुंबई उपनगरातील 42 क्षेत्रांचे सर्वेक्षण झाले असून त्यापैकी 21 क्षेत्रांचे सीमांकन निश्चित करण्यात आले आहे. 14 क्षेत्रांचे सीमांकन प्रगतीपथावर आहे. मुंबई शहरातील 19 क्षेत्रापैकी 12 क्षेत्रांचे सीमांकन झाले असून 7 क्षेत्रे ही एमबीपीटी, रेल्वे, केंद्र शासन यांच्या मालकीची जमीन असल्याने काही समस्या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
 
‘सीएमएफआरआय’च्या अहवालानुसार मच्छिमारीशी संबंधीत विविध कामांच्या क्षेत्राचा सीमांकनामध्ये समावेश करणेचा आहे. महसूल विभागाकडून करण्यात आलेले सीमांकन प्रसिद्ध करण्यात आले असून यासंदर्भात प्राप्त झालेल्या सूचना व हरकती महसूल विभागास कळविण्यात येतील, असे मुंबई महापालिकेच्या संबंधीत विभागाकडून यावेळी सांगण्यात आले. कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनच्या अनुषंगाने मच्छिमार गावांच्या सीमांकनाबाबत यावेळी चर्चा झाली. गावठाणातील समस्यांसंदर्भातही चर्चा झाली.
 
बैठकीस खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, संबंधीत जिल्हाधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी, कोळीवाड्यांमध्ये कार्य करणार्‍या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.