अलिबाग । दमणवरुन अलिबाग अशी अवैध दारू वाहतूक करणार्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली आहे. या दोघांकडून लाखो रुपयांचा महागडा दारूसाठा तसेच डस्टर गाडी जप्त करण्यात आली आहे.
अवैध दारुची वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार संशयित डस्टर गाडी कार्लेखिंड येथे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालक गाडी न थांबविता अलिबागच्या दिशेने निघून गेला.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी त्यांचा पाठलाग करत पिंपळभाट येथे दोघांना ताब्यात घेतले. गाडीची तपासणी केली असता, गाडीमध्ये महागड्या कंपनीच्या दारूच्या बाटल्यांचे 10 बॉक्स आढळून आले.
याबाबत त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ही दारू दिव-दमण येथून आणल्याचे त्यांनी कबूल केले. ही दारू कोणासाठी आणण्यात येत होती, याबाबतचा तपास उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करीत आहेत.