घन:श्याम कडू/उरण : मासेमारी बंदी असतानाही व यापूर्वी काही बोटींवर कारवाई होऊनही आजही करंजा बंदरात मासेमारी होऊन मोठ्या प्रमाणात बाजार भरत आहे. याकडे अधिकारी वर्ग दुर्लक्ष करीत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
शासनाने 1 जूनपासून खोल समुद्रातील मासेमारी बंदी केली असतानाही खोल समुद्रातून मासेमारी करून आणलेल्या मासळीचा बेधडक लिलाव येथे पहायला मिळत आहे. करंजा इन्फ्रा प्रोजेक्ट या ठिकाणच्या रस्त्यावर पहाटेपासून नेहमीच मासेमारीस गेलेल्या ट्रॉलरमधून मासळीचा लिलाव खुलेआम होत आहे. मासळी खरेदी करण्यासाठी तसेच रिक्षा, जीप व इतर छोट्या मोठ्या गाड्यांतून पापलेट, कोळंबी, हलवा या मासळीचा लिलाव घेण्यासाठी मुंबई, नवी मुंबई, मुंब्रा, पनवेल, वाशी, ठाणा, डोंबिवली आदी ठिकाणावरुन माणसांचे लोंढेच्या लोंढे येत आहेत. अशा प्रकारचा मासळीचा लिलाव हा दररोज भरत असल्याची माहिती करंजा गावातील नाखवांनी दिली.
यापूर्वी काही बोटींवर व त्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याचा कोणताही परिणाम बोटमालकांवर न होता आजही दिवसाढवळ्या करंजा इन्फ्रा प्रोजेक्टजवळील रस्त्यावर हा मासळी मार्केट भरत आहे. त्या ठिकाणी लाखों रुपयांच्या मासळीची विक्री होत आहे. मासेमारी करण्यासाठी आजही 20 ते 25 बोटी समुद्रात गेल्याची माहिती मासळी विक्रेते नाखवांनी दिली. संबंधित खात्याच्या अधिकारीवर्गाने याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.